वसतिगृहातील विद्यार्थ्यांची आठवड्यातून दोनदा करा तपासणी
By Admin | Updated: February 3, 2015 00:57 IST2015-02-03T00:56:06+5:302015-02-03T00:57:16+5:30
नरहरी झिरवाळांनी केली प्रकाश वडजेंना सूचना

वसतिगृहातील विद्यार्थ्यांची आठवड्यातून दोनदा करा तपासणी
नाशिक : शासकीय व निमशासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वेळेवर आरोग्य सुविधा व उपचार मिळत नसल्याने त्यांना खासगी दवाखान्यातून सुविधा घ्याव्या लागत असल्याने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कार्यरत आरोग्य अभियानाच्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आठवड्यातून दोनवेळा या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात यावी, अशी मागणी आमदार नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्याकडे केली आहे. आमदार नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या सूचनेनुसार प्रकाश वडजे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांना याबाबत पत्र देणार असल्याचे सांगितले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना रात्री उशिरा किंवा पहाटे उलट्या, जुलाब यांसह विविध त्रास झाल्यावर त्यांना लगेचच उपचार मिळविण्यासाठी धावपळ करावी लागते. वसतिगृहातील विद्यार्थ्यांची नियमित सकाळच्या सत्रात आरोग्य तपासणी झाल्यास पुढचे आजार उद्भवणार नाहीत, असे आमदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितले. या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी दुपारी चारनंतर येत असल्याने विद्यार्थ्यांना त्या आरोग्य तपासणीचा फारसा लाभ होत नाही. कारण विद्यार्थ्यांना रात्री किंवा सकाळी आरोग्य विषयक त्रास झाल्यावर आश्रमशाळेच्या शिक्षकांना व अधीक्षकांना त्यांना नजीकच्या दवाखान्यात उपचारासाठी न्यावे लागते. त्यामुळे वसतिगृहातील विद्यार्थ्यांची कार्यालयीन वेळेत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोनवेळा आरोग्य तपासणी करण्याची मागणी आमदार नरहरी झिरवाळ यांनी उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांच्याकडे केली. त्यानुसार प्रकाश वडजे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाकचौरेंना पत्र देऊन त्याबाबत कार्यवाही करण्याची सूचना करणार आहेत.(प्रतिनिधी)