दिवाळी : आज लक्ष्मीपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 01:00 IST2019-10-27T01:00:03+5:302019-10-27T01:00:37+5:30
दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव हा सणाला धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन आणि त्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा तथा बलिप्रतिपदा साजरी करण्यात येते.

दिवाळी : आज लक्ष्मीपूजन
नाशिक : दिवाळी म्हणजे आनंदाचा उत्सव हा सणाला धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजन आणि त्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा तथा बलिप्रतिपदा साजरी करण्यात येते. रविवारी (दि. २७) नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. यानिमित्त पहाटे स्नान करून मनोभावे लक्ष्मीपूजन करण्यात येणार आहे.
अश्विन शुद्ध चतुर्दशी (नरकचतुर्दशी) या दिवशी सूर्योदयापूर्वी अंगाला तेल लावून उष्णोदकाने स्नान करण्याची प्रथा आहे. तसेच यावेळी आघाडा वनस्पतीने अंगावर शिंपन करून नंतर यमराजाला वंदन व जलांजली देण्याची प्रथा आहे. काही समाजात या दिवशी पितृस्मरण करण्याची प्रथा आहे. आपल्या पूर्वजांचे स्मरण करून कुटुंब आणि नव्या पिढीला आरोग्य, सुखसमृद्धी लाभावी अशी प्रार्थना करण्यात येते. नरकचतुर्दशीसंबंधी एक पौराणिक कथादेखील असून, यादिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून बंदीवासातील सोळा हजार स्त्रियांना मुक्त केले. मृत्यूसमयी नरकासुराने वर मागितला होता की, ‘आजच्या दिवशी जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पिडा होऊ नये’, तेव्हापासून नरकचतुर्दशी मानली जाते, या दिवशी सूर्योदयापूर्वी अभ्यंग स्नान करतात. लक्ष्मीपूजनाचा विधी रविवारी सायंकाळी होणार आहे. लक्ष्मीपूजनासाठी व्यापारी, नागरिक उत्सुक आहेत. त्यानिमित्त झेंडूची फुले, लक्ष्मीपूजनाचे साहित्याच्या खरेदीसाठी गर्दी दिसून आली.
असा आहे मुहूर्त
दीपोत्सवाचा आनंद द्विगुणीत करणाऱ्या लक्ष्मीपूजनासाठी व्यापारीवर्गासह सर्वसामान्य नागरिक उत्सुक आहे. रविवारी (दि. २७) सकाळी ९.२७ ते १0.५३ लाभ मुहूर्त असून, सकाळी १0.५३ ते १२.१९ अमृत मुहूर्त आहे. तसेच दुपारी १.४५ ते ३.११ पर्यंत शुभ मुहूर्त असून, सायंकाळी ६.0२ ते ९.११ पर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त अशी माहिती ब्रह्मवृंदांनी दिली.