दिवे आगार गणेश मंदीर गुन्ह्यातील प्रमुख फरार आरोपी येवला पोलिसांकडून चर्तुभूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2020 00:31 IST2020-10-26T20:40:48+5:302020-10-27T00:31:06+5:30
येवला : तालुक्यातील घरफोड्या प्रकरणांचा तपास करतांना सराईत गुन्हेगारांचा शोध घेणार्या तालुका पोलिसांनी सन 2012 मध्ये रायगड जिल्ह्यातील दिवे आगार येथील श्री गणेश मंदिर दरोडा व खून प्रकरणातील फरार प्रमुख आरोपीला मोठ्या शिताफीने पकडले आहे.

दिवे आगार गणेश मंदीर गुन्ह्यातील प्रमुख फरार आरोपी येवला पोलिसांकडून चर्तुभूज
येवला : तालुक्यातील घरफोड्या प्रकरणांचा तपास करतांना सराईत गुन्हेगारांचा शोध घेणार्या तालुका पोलिसांनी सन 2012 मध्ये रायगड जिल्ह्यातील दिवे आगार येथील श्री गणेश मंदिर दरोडा व खून प्रकरणातील फरार प्रमुख आरोपीला मोठ्या शिताफीने पकडले आहे.
तालुक्यातील खरवंडी व रहाडी या गावांमध्ये 19 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री बर्याच ठिकाणी घरफोड्या व चोर्या झाल्या होत्या. याबाबत तालुका पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले होते. दाखल झालेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील, मनमाड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शन व सुचनांवरून तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ भिसे, उज्वलसिंह राजपुत यांनी पथके तयार करून तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारांच्या हालचालीबाबत गोपनीय माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत गुन्हेगार तपासणी सुरु केली होती. तपासा दरम्यान येवला- वैजापुर सिमेवर असणारे बिलवणी (ता. वैजापुर, जि. औरंगाबाद) येथे एक इसम गेल्या काही दिवसांपासुन संशयीतरीत्या वावरत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
सहाय्यक पोलिस निरीक्ष भिसे, राजपुत, पोलिस हवालदार सानप, पोलिस शिपाई मोरे, आबा पिसाळ, मुकेश निकम यांनी भारम परिसरामध्ये दोन दिवस सलग सापळा लावला. गुरूवारी, (दि. 22) रोजी तो भारम येथे आला असता त्यास ताब्यात घेतले. यावेळी त्याने पोलीस पथकाबरोबर झटापट केली होती. त्याने त्याचे नाव शिवा जनार्दन काळे (वय 26), रा. मौजे बिलवणी, ता. वैजापुर, जि. औरंगाबाद असे सांगीतले. त्याच्या राहत्या घरामधुन कटावणी, टॉमी, पक्कड, स्क्रु ड्रायव्हर, तीन टॉर्चलाईट, एक चॉपर व एक चाकु असे घरफोडीचे साहित्य जप्त करण्यात आले होते. सदर आरोपीस न्यायालयाने पोलीस कोठडी दिलेली असुन त्याच्याकडे अधिक तपास चालु होता.
येवला तालुका पोलीस ठाणे यांनी घरफोडीमध्ये अटक केलेल्या आरोपीने प्रथम त्याचे नाव शिवा जनार्दन काळे असे सांगीतले होते. तथापी त्याच्याबाबत अधिक माहिती घेतली असता तो दिवेआगार गणपती मंदीर दरोडा प्रकरणातील प्रमुख आरोपी सतीश उर्फ सत्या जैनु काळे हा असल्याचे व सन 2018 मध्ये पोलीसांच्या ताब्यातुन पळुन गेल्यानंतर नाव बदलुन राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या आरोपीवर यापूर्वी घरफोडी, जबरी चोरी, दरोडा, खुनासहित दरोडा असे अनेक गुन्हे नोंद आहेत. तर या आरोपीचा अनेक जिल्हयांमध्ये शोध सुरू होता.
सन 2012 मध्ये दिवेआगार गणेश मंदीर, जि. रायगड येथील मंदीरामध्ये दरोडा टाकुन दोन सुरक्षारक्षकांचा खुन करुन गणेश मुर्तीचा सोन्याचा मुखवटा चोरल्याचे प्रकरण गाजले होते. त्याबाबत दिघी सागरी पोलीस ठाणे, रायगड येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 12 आरोपीतांना विशेष मोक्का व्यायालय तथा अतिरीक्त सत्र न्यायालय, अलिबाग, रायगड यांनी शिक्षा सुनावली होती. त्यापैकी सतीश उर्फ सत्या जैनु काळे यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती व तो नागपुर कारागृह येथे शिक्षा भोगत होता. दरम्यान, दोषसिध्द आरोपी सतीश उर्फ सत्या जैनु काळे यास सन 2018 मध्ये सुनावणीकामी निफाड सत्रन्यायालयात आणले गेले होते. सुनावणी झाल्यावर त्यास पोलीस रेल्वेने नागपुर येथे घेवुन जात असताना तो भुसावळ रेल्वे स्टेशन येथुन पोलीसांच्या ताब्यातुन पळुन गेला होता व तेव्हापासुन तो फरार होता.