जिल्ह्यात संततधार : दुबार पेरण्या टळणार?
By Admin | Updated: July 20, 2015 23:46 IST2015-07-20T23:46:18+5:302015-07-20T23:46:51+5:30
चोवीस तासांत २२० मिमी पाऊस

जिल्ह्यात संततधार : दुबार पेरण्या टळणार?
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी मध्यरात्रीनंतर सोमवारी दिवसभर संततधार सुरू ठेवल्याने जिल्ह्यातील बळीराजावर दुबार पेरण्यांचे ओढवलेले संकट काहीसे टळण्याची चिन्हे आहेत. काल (दि. २०) सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्णात २२० मिलीमीटर पावसाची नोेंद करण्यात आली.
पावसाने जुलै महिन्यात दडी मारल्याने खरिपाच्या ६० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर झालेल्या पेरण्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढविले होते. दुबार पेरण्यांच्या दृष्टीने कृषी विभागाने बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत नियोजनही सुरू केले होते. रविवारी मध्यरात्रीपासूनच पावसाने जिल्ह्णात काही तालुक्यांत कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. सोमवारी दिवसभर शहरासह जिल्ह्णात पावसाची संततधार कायम होती. अधून-मधून पावसाचा जोर कमी अधिक होत होता. पावसाच्या या हजेरीमुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी (दि.२०) सकाळी ८ वाजेपर्यंत नोंदविण्यात आलेली मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे - नाशिक - ५.५, इगतपुरी - ६७, दिंडोरी - १६, पेठ - २९, त्र्यंबकेश्वर - २४, कळवण - ३.५, सुरगाणा - ७२.८, देवळा - १.२, निफाड - १.४, असा एकूण २२०.४ मिलीमीटर पाऊस नोेंदविण्यात आला असून, त्यात नांदगाव, येवला, सिन्नर, बागलाण, चांदवड, मालेगाव या तालुक्यांत पावसाची नोंद नव्हती. सोमवारी मात्र पावसाने काही तालुक्यांचा अपवाद वगळता सर्वच तालुक्यांत कमी-अधिक स्वरूपात हजेरी लावल्याचे कळते. जिल्ह्णात खरिपाच्या पेरण्यांसाठी अजूनही दमदार पावसाची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)