झनकरप्रकरणी जिल्हा रुग्णालयाकडून न्यायालयाला खुलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST2021-08-20T04:20:10+5:302021-08-20T04:20:10+5:30
नाशिक : लाच स्वीकारल्याप्रकरणी जाळ्यात अडकलेल्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांची प्रकृती बरी नसल्याच्या कारणावरून वारंवार जिल्हा रुग्णालयात दाखल ...

झनकरप्रकरणी जिल्हा रुग्णालयाकडून न्यायालयाला खुलासा
नाशिक : लाच स्वीकारल्याप्रकरणी जाळ्यात अडकलेल्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांची प्रकृती बरी नसल्याच्या कारणावरून वारंवार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याबाबत न्यायालयाने पाठवलेल्या नोटीसला जिल्हा रुग्णालयाकडून खुलासा पाठविण्यात आला आहे.
न्यायालयाने झनकर यांचा अंतरिम जामीन नामंजूर करीत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. मात्र, तत्पूर्वीच झनकर यांनी छातीत दुखण्याची तक्रार केली होती. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने पाठवलेल्या नोटीसला उत्तर देताना जिल्हा रुग्णालयाने झनकर या मंगळवारी (दि.१७) सायंकाळी उशिरा वैद्यकीय तपासणीसाठी आल्यानंतरच्या सर्व कार्यवाहीची माहिती दिली. झनकर यांची प्राथमिक तपासणी तसेच तज्ज्ञ तपासणी करण्यात आली. तज्ज्ञ तपासणीदरम्यान संबंधित डॉक्टरांनी त्यांना हृदयासंदर्भात काही तपासणी करण्यास सांगितले. त्यासाठीच्या टु डी इको आणि ट्रॉपोनिन टी टेस्टची सुविधा ही जिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने तसेच संदर्भ रुग्णालयात त्यावेळी तज्ज्ञ उपलब्ध नसल्याने दुसऱ्या दिवशी अर्थात बुधवारी (दि.१८) सकाळी नेण्यात आले. तपासणीदरम्यान हृदयासंदर्भातील सर्व चाचण्या निगेटिव्ह आणि सारे काही सुरळीत असल्याने त्यांना बुधवारीच जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तसेच अहवालाची खात्री करून त्याच दिवशी म्हणजे बुधवारी दुपारी श्रीमती झनकर यांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देऊन एसीबीच्या अधिकाऱ्यांकडे ताब्यात देण्यात आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी जिल्हा न्यायालयाला पाठविलेल्या खुलाशात नमूद केले आहे.