जिल्हा बॅँकेची अंतिम प्रारूप यादीला मुहूर्त

By Admin | Updated: April 10, 2015 23:58 IST2015-04-10T23:57:39+5:302015-04-10T23:58:47+5:30

४६३३ एकूण मतदार

District Bench final format list | जिल्हा बॅँकेची अंतिम प्रारूप यादीला मुहूर्त

जिल्हा बॅँकेची अंतिम प्रारूप यादीला मुहूर्त


नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास मुंबई उच्च न्यायालयाची असलेली स्थगिती उठल्यानंतर दोन दिवसांनी काल(दि.१०)रात्री उशिरा जिल्हा सहकारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक एम. ए. आरीफ यांनी जिल्हा बॅँकेची अंतिम प्रारूप यादी प्रसिद्ध केली. अ गटात १०५३, तर ब गटात ३९८० असे एकूण ४६३३ एकूण मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
दरम्यान, दोन दिवस उलटूनही विभागीय सहनिबंधक कार्यालयाला उच्च न्यायालयाचे आदेशच प्राप्त होत नसल्याचे कारण सांगण्यात येत असून, मागील दाराने या दोन दिवसांत जिल्हा बॅँक मतदार यादीत काही दुरुस्ती करण्यात येत असल्याबाबत चर्चा होती.
नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या आधी जाहीर झालेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार २५ मार्च रोजीच जिल्हा बॅँकेच्या सभासद मतदारांची अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र, त्या यादीवर डॉ. गिरीश मोहिते यांच्यासह अन्य दोघांनी हरकत घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. बुधवारी (दि. ८) मुंबई उच्च न्यायालयात द्विसदस्यीय न्या. गवई व न्या. गडकरी यांच्या खंडपीठासमोर या तीनही याचिकांवर सुनावणी होऊन तीनही याचिका फेटाळण्यात आल्या होत्या. न्यायालयाने अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास दिलेली स्थगिती उठविल्याने जिल्हा सहकार निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक कार्यालयाच्या वतीने अंतिम करण्यात आलेली मतदारांची प्रारूप यादी गुरुवारी प्रसिद्ध होण्याची शक्यता होती. मात्र, शुक्रवारी सायंकाळपर्यंत उच्च न्यायालयाचे  लेखी आदेश प्राप्त न झाल्याने अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यास अडचण असल्याचे चित्र उभे करण्यात आले. त्यानंतर मुंबईला सरकारी अभियोक्त्यांकडून कार्यालयाने मार्गदर्शन मागविल्यानंतर यादी प्रसिद्ध करण्याचा निर्णय झाल्याची माहिती विभागीय उप निबंधक सतीश खरे यांनी दिली. त्यानंतर रात्री उशिरा विभागीय सहनिबंधक कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय व जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात ही अंतिम प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे लवकरच जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची चिन्हे आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: District Bench final format list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.