‘जनस्थान’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
By Admin | Updated: February 26, 2015 23:49 IST2015-02-26T23:49:48+5:302015-02-26T23:49:58+5:30
‘जनस्थान’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

‘जनस्थान’चे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
नाशिक : मराठी साहित्यातील सर्वोच्च असा ‘जनस्थान’ पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या (दि. २७) ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरुण साधू यांना प्रदान केला जाणार आहे. येथील महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी ४ वाजता हा दिमाखदार सोहळा होणार आहे.
एक लक्ष रुपये, ब्रॉँझची सूर्यमूर्ती व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून सुरू झालेला हा पुरस्कार येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने सन १९९१ पासून दर वर्षाआड दिला जातो. मराठी साहित्यात बहुमोल योगदान देणाऱ्या साहित्यिकाला कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी (२७ फेब्रुवारी) या पुरस्काराने सन्मानित केले जाते.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक हे उद्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. कार्यक्रमात कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, ‘ग्रंथाली’ प्रकाशनाचे दिनकर गांगल, कर्णिक, साधू व फडणवीस यांची भाषणे होतील. दरम्यान, या समारंभाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. कार्यक्रमाला सर्वांना मुक्त प्रवेश असून, रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उपाध्यक्ष किशोर पाठक, कार्यवाह लोकेश शेवडे यांनी केले आहे.