राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस कार्यकारीणी बरखास्त
By Admin | Updated: May 22, 2017 13:47 IST2017-05-22T13:47:43+5:302017-05-22T13:47:43+5:30
शहर राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसची कार्यकारीणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी बरखास्त केली आहे.

राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस कार्यकारीणी बरखास्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शहर राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसची कार्यकारीणी राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी बरखास्त केली आहे. नूतन कार्यकारीणी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे अंबादास खैरे यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये खांदेपालटाचे वारे वाहत आहे. त्यातच राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या प्रमुख खासदार सुप्रिया सुळे यांच्या नाशिक दौऱ्यात महिला पदाधिकाऱ्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी महिला जिल्हाध्यक्ष शोभा मगर यांच्या जागी प्रेरणा बलकवडे यांची वर्णी लावली होती. त्याच वेळी पक्षाला आलेली मरगळ झटकण्यासाठी सर्वच स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या कार्यकारीणीत बदल करण्याचे संकेत दिले होते. अंबादास खैरे शहराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळी आंदोलने आणि मोर्चे काढून संघटन पातळीवर पक्ष सक्रीय ठेवला होता. मात्र राष्ट्रवादी शहर युवक कॉँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांमध्ये मरगळ आली असून, त्यांच्या जागी सक्रीय युवक कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला असून, त्यामागे पक्ष संघटन मजबूत करण्याचा उददेश असल्याचे राष्ट्रवादी शहर युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत जे पदाधिकारी सक्रीय नव्हते. तसेच ज्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्या. त्यांची पदे काढून ती सक्रीय कार्यकर्त्यांना देण्यासाठीच शहर राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसची सर्व कारीणी बरखास्त केल्याचे खैरे यांचे म्हणणे आहे.