नाशिकच्या मोरवाडी स्मशानभूमीत मृतदेहाची अवहेलना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 15:00 IST2018-08-14T14:56:38+5:302018-08-14T15:00:44+5:30
महापालिकेच्या वतीने विजयनगर येथे वैकुंठधाम मोरवाडी या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून मोफत अंत्यविधीसाठी अमरधाम सुरू करण्यात आले आहे. यासाठी मनपाने ठेकेदाराची नियुक्ती केली असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून एकच ठेकेदाराकडे याचे कामकाज देण्यात आल्याने ठेकेदार मनपा अधिकारी अथवा नगरसेवक यांना जुमानत न

नाशिकच्या मोरवाडी स्मशानभूमीत मृतदेहाची अवहेलना
नाशिक : महापालिकेच्या मोरवाडी स्मशानभूमीची दयनीय अवस्था झाली असून, याठिकाणी अंत्यविधी करण्यात येणाऱ्या मृतदेहाची अंत्यसंस्कारानंतर अवहेलना होत असल्याची बाब सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. अंत्यसंस्कार केल्यानंतर मृताचे नातेवाईक निघून गेल्यानंतर संबंधित ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे चितेजवळ परिसरातील काही मोकाट कुत्रे जाऊन त्या मृतदेहाची अवहेलना करीत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. सदर प्रकार थांबवावा, अशी मागणी लोकप्रतिनिधी व नागरिकांनी केली आहे.
महापालिकेच्या वतीने विजयनगर येथे वैकुंठधाम मोरवाडी या नावाने गेल्या अनेक वर्षांपासून मोफत अंत्यविधीसाठी अमरधाम सुरू करण्यात आले आहे. यासाठी मनपाने ठेकेदाराची नियुक्ती केली असली तरी गेल्या अनेक वर्षांपासून एकच ठेकेदाराकडे याचे कामकाज देण्यात आल्याने ठेकेदार मनपा अधिकारी अथवा नगरसेवक यांना जुमानत नसल्याचे चित्र बघायास मिळत आहे. या ठिकाणी संबंधित ठेकेदाराने अंत्यविधी करण्यासाठी येणा-यांना पुरेसे लाकूड तसेच अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य देणे बंधनकारक असताना यात अनेकदा रॉकेल शिल्लक नसते तर काहीवेळा इतर साहित्याचीदेखील कमतरता असते. स्मशानभूमीतील लाकडे उघड्यावर पडलेली असून, सध्या पावसाळा सुरू असल्याने लाकूड हे ओले होत आहे. त्याचाच वापर अंत्यविधीसाठी केला जातो, त्यामुळे मृतदेह अर्धवट जळतो. मृतदेह हा पूर्णपणे जळाला का नाही हे बघणे संबंधित ठेकेदाराचे काम असताना त्याकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष केले जात असल्याने मोकाट कुत्रे तेथे येऊन चितेवर ठेवलल्या मृतदेहाची अवहेलना करीत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने या प्रकाराची माहिती महापालिका तसेच नगरसेवकांना दिल्यावर धावपळ उडाली. घटनेचे गांभीर्य ओळखून मनपा आरोग्य विभागाचे विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे, नाना जगताप, रवि जाधव, गोविंद घुगे, भूषण राणे आदींनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली.
चौकट...
मोरवाडी स्मशानभूमीतील या गंभीर प्रकाराबाबत लोकप्रतिनिधी व नागरिकांनी तक्रार केल्यामुळे आता महापालिका प्रशासन ठेकेदाराबाबत काय भूमिका घेते, शिवाय मोकाट कुत्र्यांचा स्मशानभूमीतील वावराबाबत काय उपाययोजना करते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. अत्यंत संवेदनशील व भावनेशी निगडीत हा प्रश्न असल्यामुळे लोकप्रतिनिधींनी यात गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी केली जात आहे.