पाचशे, दोन हजाराच्या नोटांचा रंग उडाल्याची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:14 IST2021-03-06T04:14:41+5:302021-03-06T04:14:41+5:30
नाशिक : चनलात नव्याने आलेल्या शंभर, दोनशे, पाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटांचा आता रंग उडत असल्याची चर्चा सध्या सुरू ...

पाचशे, दोन हजाराच्या नोटांचा रंग उडाल्याची चर्चा
नाशिक : चनलात नव्याने आलेल्या शंभर, दोनशे, पाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटांचा आता रंग उडत असल्याची चर्चा सध्या सुरू असून नवीन नोटांचा रंग फिका पडत असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये होत आहे. मात्र या नोटा परत करण्यासाठी अद्याप एकही ग्राहक बँकेत आला नाही. त्यामुळे ग्राहकांनी केवळ आरबीआयच्या निर्देशांचेच पालन करावे, अन्य माध्यायमांतून होणाऱ्या चर्चा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असे बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केले आहे.
देशात काही ठिकाणी नोटांचा रंग फिका झाल्याने त्या बदलून घेण्यासाठी ग्राहक बँकेत येत असल्याची चर्चा सध्या होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील काही बँकांमध्ये पडताळणी केल्यानंतर अद्याप अशा तक्रारी नसल्याचे दिसून आले. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्री जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा व्यवहारातून बंद झाल्या. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने ५००रुपयांच्या व २००० रुपयांच्या नवीन नोटा बाजारात आणल्या. मात्र, नोटांच्या कागदाचा दर्जा चांगला नसल्याने २ हजारांच्या नोटा लवकर खराब होत असल्याची ग्राहकांची तक्रार असल्याच्या चर्चा विविध माध्यमांतून सुरू आहे. रिझर्व्ह बँकेने २०१९-२० या वर्षांत २ हजारांची एकही नवीन नोट छापली नाही. त्यानंतर शंभर रुपयाची निळी, दोनशे रुपयांची पिवळी, पाचशे रुपयांची करडी, दोन हजार रुपयांची गुलाबी नोट चलनात आली. यातील काही नोटांचा रंग जात असल्याचे ग्राहकांचे म्हणने आहे.
इन्फो-
कागद निकृृष्ठ असल्याचे मत, मात्र एकही तक्रार नाही.
नोटाबंदीनंतर घाईघाईत नवीन दोन हजार रुपयांच्या नोटा छापण्यात आल्या होत्या. या नोटांसाठी वापरण्यात आलेला कागद निकृष्ट दर्जाचा होता. त्यामुळे त्या लवकर खराब होत असल्याचे मत काही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र, बँकांना ग्राहकांकडून फाटक्या नोटा घेणे बंधनकार आहे. ग्राहकांना कमिशन एजंटकडे पाठवणे चुकीचे आहे. कोणी तक्रार केली तर रिझर्व्ह बँक त्या बँकेवर कारवाई करू शकते.
कोट-१
अद्याप तरी रंग उडाला म्हणून नोटा परत करणाऱ्या ग्राहकांची कुठेच तक्रारी नाहीत. बँकेत अद्यापपर्यंत अशा नोटा येत असल्याची माहिती दिली नाही. त्यामुळे अद्याप नोटांचा रंग उडाल्याची एकही तक्रार नाही. त्यामुळे ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
-मनोहर पवार , शाखा व्यवस्थापक, महारष्ट्र राज्य सहकारी बँक , नाशिक
कोट-२
नोटांचे रंग जात असल्याची कोणतीही तक्रार अद्यापक बँक कर्मचाऱ्यांपर्यंत आलेली नाही. नोटांच्या संबधि आरबीआयने काही निर्देश घालून दिले आहे. त्यानुसार ग्राहकांना त्यांच्या नोटा बदलून देण्याची यंत्रणाही आहे. परंतु यात अद्याप नोटांचे रंग जात असल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात आलेली नाही.
- आदित्य तुपे , खजीनदार, बँक ऑफ महाराष्ट्र एम्पलॉईज युनियन