कुलंग गडावरील रेस्क्यू ऑपरेशनची गुजरातमध्ये चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:23+5:302021-09-06T04:18:23+5:30
नाशिक : इगतपुरीतील कुलंग गडावर अडकलेल्या गुजरातच्या पर्यटकांना वाचविण्यात आल्यानंतर या मोहिमेची दखल गुजरातमधील माध्यमांकडून देखील घेण्यात आली. सुमारे ...

कुलंग गडावरील रेस्क्यू ऑपरेशनची गुजरातमध्ये चर्चा
नाशिक : इगतपुरीतील कुलंग गडावर अडकलेल्या गुजरातच्या पर्यटकांना वाचविण्यात आल्यानंतर या मोहिमेची दखल गुजरातमधील माध्यमांकडून देखील घेण्यात आली. सुमारे सहा तास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशननंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सर्व पर्यटकांना सुखरूप खाली आणले. अत्यंत अवघड आणि खडतर अशा या मोहिमेची राज्याच्या आपत्ती विभागाकडून देखील दखल घेण्यात आली. आता गुजरातमध्ये या मोहिमेविषयी अनेक माध्यमांनी दखल घेतली आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कुलंग किल्ल्यावर रात्रीच्या सुमारास १३ पर्यटक भरकटल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला पहाटेच्या सुमारास मिळाली. तीन मुले, आठ पुरुष आणि दोन महिला गिर्यारोहणासाठी गुजरातहून नाशिकमध्ये आले होते. हे सर्व इगतपुरी तालुक्यातील कुलंग गडावर चढाई करीत असताना रात्र झाल्यामुळे भरकटले. त्यामुळे त्यांना खाली येता येईना आणि वरही जाणे शक्य होत नव्हते. अशावेळी त्यांनी सर्व प्रकारची मदत मिळविण्याचा प्रयत्न केला. अशावेळी पहाटेच्या सुमारास गुजरातमधून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला एक कॉल आला आणि घटनेची माहिती मिळाली.
निफाड येथील रेस्क्यू टीम लागलीच इगतपुरीत येऊन धडकली आणि सहा तासांच्या प्रयत्नांनंतर सर्वच्या सर्व पर्यटकांना वाचविण्यात यश आले. पावसाच्या सरी आणि अंधुक प्रकाश असतानाही केवळ शिट्टीच्या आवाजाच्या दिशेने ही मोहीम पूर्ण करण्यात आली. मोबाईल बंद झाल्याने तसेच रेंजमुळे शिट्टी हेच केवळ संपर्काचे साधन बनले हेाते. पर्यटकांच्या शिट्ट्या आणि बचाव पथकाकडून होणारा शिट्टीचा आवाज यावर ही मोहीम यशस्वी करण्यात आली. या घटनेचा थरार गुजरातच्या माध्यमांमधून मांडण्यात आल्यानंतर गुजरातमधून अनेकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आवर्जून कौतुक केले.
050921\05nsk_25_05092021_13.jpg
सिंगल कॉलनी