गुन्हेगारांच्या राजकीय संबंधांची चर्चा
By Admin | Updated: May 14, 2014 00:31 IST2014-05-14T00:09:22+5:302014-05-14T00:31:40+5:30
चौकशीसाठी चार नगरसेवकांना पोलिसांच्या नोटिसा

गुन्हेगारांच्या राजकीय संबंधांची चर्चा
चौकशीसाठी चार नगरसेवकांना पोलिसांच्या नोटिसा
नाशिक : मोहन चांगले खून प्रकरणातील संशयितावर जिल्हा रुग्णालयातील प्रिझन वॉर्डवरील हल्ला, भीम पगारेची हत्त्या, व्यावसायिकाचे अपहरण करून वसूल केलेली खंडणी या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगार व राजकीय पक्ष यांचे साटेलोटे लक्षात घेऊन नाशिक पोलिसांनी सेना व मनसेच्या काही नगरसेवकांना चौकशीसाठी नोटिसा बजावल्याने गुन्हेगारांचे राजकीय व्यक्तींशी असलेल्या संबंधांबाबत चर्चा सुरू झाली आहे़ ज्यांना नोटिसा बजावल्या त्यात सेनेचे महानगरप्रमुख, मनपा विरोधी पक्षनेते, नगरसेवक, मनसे नगरसेवक असल्याने शहरातील राजकारण कोणत्या दिशेने चालते याची चर्चा सुरू झाली आहे़
शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारांशी संबंध असल्याचे तपासात समोर आले़ त्यानुसार मनपा विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते, शिवसेना नगरसेवक दत्तात्रय तथा डी़ जी़ सूर्यवंशी, मनसे नगरसेवक सतीश (बापू) सोनवणे यांना पोलिसांनी नोटिसा काढल्या आहेत़ परिमंडळ-१ चे पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ यांनी सुधाकर बडगुजर, दत्तात्रय सूर्यवंशी आणि सतीश सोनवणे यांना, तर परिमंडळ-२ चे पोलीस उपआयुक्त डॉ़ डी़ एस़ स्वामी यांनी अजय बोरस्ते यांना नोटीस काढली़
या चौघांनाही नोटीस काढल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला असून, नाव न छापण्याच्या अटीवर उद्या (दि़ १४) सकाळी संबंधितांना पोलीस उपआयुक्तांच्या कार्यालयात हजर राहण्याचे फ र्मान सोडले आहे़ (प्रतिनिधी)