उस्मानाबाद-सुरत बस प्रवाशांची गैरसोय
By Admin | Updated: August 3, 2015 00:06 IST2015-08-03T00:05:43+5:302015-08-03T00:06:04+5:30
उस्मानाबाद-सुरत बस प्रवाशांची गैरसोय

उस्मानाबाद-सुरत बस प्रवाशांची गैरसोय
पांडाणे : राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक येथील महामार्ग बसस्थानकावर वाहतूक नियंत्रकांकडून सहकार्य केले जात नसल्याचा अनुभव प्रवाशांना येत आहे. दरम्यान उस्मानाबाद-सुरत बसला ठक्कर बाजार बसस्थानकावर थांबा द्यावा व स्थानकावरील बसचा मार्ग पुकारण्यात यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
पंढरपूरहून येणाऱ्या अनेक भाविकांना महामार्ग बसस्थानकात कटु अनुभव येत आहे. काही प्रवाशांनी शनिवारी रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी महामार्ग बसस्थानक गाठले. ठक्कर बाजार ते महामार्ग बसस्थानक हे अंतर डोक्यावर सामानाचे गाठोडे, हातात प्रसादाच्या पिशव्या व काखेत पिशवी एवढा सर्व बोजा घेऊन पार केले.
महामार्ग बसस्थानकावर कुठल्या डेपोची बस येणार व कुठल्या मार्गे मार्गस्थ होणार, कुठल्या स्थानकावर थांबणार, हे पुकारण्याचे वाहतूक नियंत्रकाला विसर पडला असावा की काय, असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. उस्मानाबाद ते सुरत ही बस रात्री रोज साडेदहा वाजता महामार्ग बसस्थानकात येते. उस्मानाबाद-सुरत ही बस नियमित बस असून, ती आधी ठक्कर बाजार बसस्थानकावर येणारी बस महामार्ग बसस्थानकाकडे का वळवली व ती महामार्गकडे वळविल्यामुळे दिंडोरी, वणी, बोरगाव व सापुतारा जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. (वार्ताहर )