‘कृउबा’चे दिलीप थेटे यांना ‘ईडी’चा धाक दाखवून मागितली खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:16 AM2021-05-09T04:16:20+5:302021-05-09T04:16:20+5:30

नाशिक : ‘तुम्ही बेहिशेबी मालमत्ता जमविली असून, तुमच्या चार ते पाच फाइल आम्हाला प्राप्त झाल्या आहेत, मी ‘ईडी’ (सक्तवसुली ...

Dilip Thete of 'Kruba' demanded ransom out of fear of 'ED' | ‘कृउबा’चे दिलीप थेटे यांना ‘ईडी’चा धाक दाखवून मागितली खंडणी

‘कृउबा’चे दिलीप थेटे यांना ‘ईडी’चा धाक दाखवून मागितली खंडणी

Next

नाशिक : ‘तुम्ही बेहिशेबी मालमत्ता जमविली असून, तुमच्या चार ते पाच फाइल आम्हाला प्राप्त झाल्या आहेत, मी ‘ईडी’ (सक्तवसुली संचालनालय) आयुक्त बोलतोय..’, असा निनावी फोन एका अज्ञाताने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्येष्ठ संचालक दिलीप थेटे यांना करत हे प्रकरण मिटवायचे असेल तर सांगितलेली रक्कम द्या, असे सांगून खंडणी वसुलीचा प्रयत्न केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. ८) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकीय पक्षांच्या मोठमोठ्या नेत्यांवरील धडक कारवाईमुळे सध्या राज्यात ‘ईडी’ अर्थात सक्तवसुली संचालनालय ही भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था चर्चेत आहे. ‘ईडी’च्या नावाने भल्याभल्यांना घाम फुटतो. याचाच गैरफायदा घेत एका अज्ञात इसमाने या संस्थेचा आयुक्त असल्याचे भासवत कृषी उत्पन्न बाजार समितीतील ज्येष्ठ संचालक दिलीप थेटे यांना धमकावण्याचा प्रकार शुक्रवारी केला. ‘ईडी’चा हा तोतया अधिकारी असल्याचे त्याच्या संभाषणावरून लक्षात आल्यानंतर शनिवारी थेटे यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या अज्ञात व्यक्तीने थेटे यांना व्यवहाराच्या अनुषंगाने चार फाइल आलेल्या असून, आता काही वेळातच आर्थिक गुन्हे शाखेकडून तुमच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. हा गुन्हा जर दाखल होऊ द्यायचा नसेल तर काही देवाणघेवाण करून हे प्रकरण येथेच थांबवता येईल, असे सांगितल्याचे थेटे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

थेटे यांनी त्याच्याकडे थोडा वेळ मागून पुढे याबाबत काय करायचे ते कळवितो, असे त्यास सांगितले. त्यानंतर पुन्हा काही वेळाने थेटे यांनी त्या मोबाइल क्रमांकावर फोन केला असता त्या तोतया ईडी अधिकाऱ्याने थेटे यांच्याकडून घर, जमीन, परिवाराबाबत सर्व माहिती विचारल्याचे फिर्यादीमध्ये थेटे यांनी म्हटले आहे. खोटी शासकीय अधिकारी अशी ओळख सांगून तोतयागिरी करून ठकबाजी करण्याचा प्रयत्न केला तसेच खंडणीची मागणी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यासह खंडणी वसुलीसाठी धमकावल्याबद्दल विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

----इन्फो----

अमरावतीत धागेदोरे असण्याची शक्यता

शहरातील काही शासकीय अधिकारी तसेच राजकीय नेत्यांना काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे धमकवल्याची चर्चा सुरू आहे. याप्रकरणी आता सायबर पोलिसांनी तपासाला गती देत प्राप्त मोबाइल क्रमांकाद्वारे तांत्रिक विश्लेषण करण्यास सुरुवात केली असून, या अज्ञात इसमाचे धागेदोरे अमरावती, नागपूर शहरात असण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे.

Web Title: Dilip Thete of 'Kruba' demanded ransom out of fear of 'ED'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app