रेशनकार्डवरील मोफत धान्य आपल्याला मिळाले का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:11 IST2021-06-24T04:11:41+5:302021-06-24T04:11:41+5:30
नाशिक : कोरोनाच्या काळात उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे हाताला काम नसल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रधानमंत्री गरीब ...

रेशनकार्डवरील मोफत धान्य आपल्याला मिळाले का?
नाशिक : कोरोनाच्या काळात उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे हाताला काम नसल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत मे आणि जून या दोन महिन्यांमध्ये कार्डधारकांना मोफत धान्य पुरवठा केला जात आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील १२ लाख २८ हजार ३२९ कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानांच्या माध्यमातून मे आणि जून महिन्याचे धान्य वितरण सुरू झाले असून जिल्ह्यात तक्रारी कमी असल्याचा दावा पुरवठा विभागाकडून केला जात आहे.
जिल्ह्यात २६०९ रेशन दुकानांच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे. मे महिन्यातील सुमारे ९५ टक्के धान्य रेशन दुकानांमध्ये पोहोचले असून कार्डधारकांना मोफत धान्य वितरण करण्यात आले असून जून महिन्यातील धान्य वाटप सुरू झाले आहे. मात्र नियमित धान्य तसेच मोफत धान्य एकत्रित दिले जात असल्याने नेमके कोणते धान्य मिळाले याबाबतची संभ्रमावस्था कार्डधारकांमध्ये दिसून आली.
--कोट--
शासनाने कोरोना कालावधीत रेशन दुकानातून प्राधान्यक्रम प्राप्त नागरिकांना मोफत धान्य देण्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार आम्हाला कुटुंबातील प्रति व्यक्ती ५ किलो उपलब्ध असलेले धान्य मिळत आहे. शासनाने दिवाळीपर्यंत धान्य देण्याचे आश्वासन दिले असल्याने आम्हाला मोठा दिलासा मिळाला आहे.
- गणेश परदेशी, रेशनकार्डधारक
इन्फो---
एकूण कार्डधारक
१२२८३२९
बीपीएल : ५८५३५१
अंत्योदय : १७२३४८
केशरी : ४७०६२९
--इन्फो==
धान्य घेतल्यानंतरच अंगठा लावा
१) रेशनकार्डधारकांना पॉस मशीनवर थम दिल्यानंतरच धान्य उपलब्ध करून दिले जात आहे. तथापि, काही ठिकाणी कार्डधारकांचे अंगठे घेतले नसल्याची बाब समोर आली आहे.
२) कोरोनाच्या काळात प्रत्येकाला पॉस मशीनवर अंगठा लावणे जिकिरीचे असल्याने काही काळाकरिता थम देण्याचा अधिकार रेशन दुकानदारांना देण्यात आला होता. परंतु याचा काही ठिकाणी गैरफायदा घेण्यात आला.
३) थम दिल्यानंतरच आपल्याला आपल्या कार्डावरील धान्य दिले जाते. त्यासाठीचा कोटा रेशन दुकानांमध्ये आलेला असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपला अंगठा देऊनच धान्य घेतले पाहिजे.
--- कोट----
दोन्ही महिन्यांचे वाटप सुरळीत
आपल्या जिल्ह्यात मे आणि जून अशा दोन्ही महिन्यांचे धान्य त्या-त्या महिन्यांमध्ये देण्यात आले आहे. त्यासाठी प्रत्येक दुकानाची मे महिन्यात धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यामुळे तक्रारी कमी झालेल्या आहेत. गंभीर तक्रारीनुसार दोन दुकाने रद्द करण्यात आली आहेत.
- अरविंद नरसीकर, जिल्हा पुरवठा अधिकारी