धर्मपाल समग्र साहित्य मराठी अनुवादाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन
By Admin | Updated: February 22, 2015 01:49 IST2015-02-22T01:49:05+5:302015-02-22T01:49:28+5:30
धर्मपाल समग्र साहित्य मराठी अनुवादाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन

धर्मपाल समग्र साहित्य मराठी अनुवादाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन
नाशिक : देशातील मूळ विचार हा विज्ञानाधारित व शाश्वत असून, मानवी विकासासाठी तो पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायला हवा. या स्वाभिमानी विचारातून तसेच भारतीय आचार व संस्कृतीच्या माध्यमातूनच देश भविष्यात महासत्तेच्या रूपाने जगावर राज्य करू शकेल, असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भारतीय शिक्षण मंडळाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने आयोजित कार्यक्रमात धर्मपाल समग्र साहित्य मराठी अनुवादाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रावसाहेब थोरात सभागृहात झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘धर्मपाल समग्र साहित्य’चे संपादक डॉ. प्रभाकर मांडे होते. भारतीय शिक्षण मंडळाचे सहसंघटनमंत्री मुकुल कानिटकर, डॉ. अशोक मोडक, राष्ट्रीय महामंत्री वामनराव गोगटे आदि व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धर्मपाल समग्र साहित्य मराठी अनुवादित अकरा खंडांचे प्रकाशन व नूतनीकृत वेबसाईटचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी फडणवीस म्हणाले की, भारतावर आक्रमणे करणाऱ्यांनी येथील मानसिकता गुलामगिरीची करून टाकली. मेकॉलेची शिक्षणपद्धत आणण्यामागे ब्रिटिशांचा तोच डाव होता. येथील प्रगत विचार नष्ट केल्याशिवाय भारतीयांवर राज्य करता येणार नाही, हे ब्रिटिश जाणून होते. सध्याही बाजाराधारित व्यवस्थेमध्ये माणसांचे मूल्य विचार वा संवेदनांच्या आधारे केले जात नाही. माणसाला ‘संसाधन’ म्हणून विकसित करून, त्यातून भौतिक विकास साधण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. देशातील संस्कृती, विचार, आचारांत विज्ञानाऐवजी अज्ञानी कर्मकांडांचे प्रस्थ वाढले, ज्ञानाऐवजी माहितीचे शिक्षण मिळू लागले, तेव्हा लोक परावलंबी झाले. याउलट भारतीय इतिहास हा देदीप्यमान, प्रगत व विज्ञानाधारित आहे. विज्ञान हे त्या-त्या भागाशी संबंधित, कालसापेक्ष बदलणारे असते. धर्मपालांनी साहित्यातून हा विचार मांडला असून, तो पुस्तकांद्वारे सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
डॉ. प्रभाकर मांडे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. भारतीय संस्कृती बदलून टाकण्याचा कट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये शिजला होता. ब्रिटिशांनी फक्त आर्थिक लूटच केली नाही, तर लोकमानसही पूर्ण बदलून टाकले. लोकांमधील अध्यात्मप्रवणता काढून टाकून त्यांना अज्ञेयवादी, अश्रद्ध बनवण्याचा प्रयत्न झाला. म्हणूनच धर्मपालांनी खऱ्या इतिहासाचे संशोधन सुरू केले. भाबडी नव्हे, वास्तवातील आत्मप्रतिभा असावी, असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी लेखन हे साधन वापरल्याचे ते म्हणाले.
अशोक मोडक यांनी सांगितले की, धर्मपालांनी देशाचा इतिहास लिहिताना एकही वाक्य प्रमाणाविना लिहिलेले नाही. स्त्रिया व शूद्रांची कदर ठेवा, असा विचार त्यांनी दिला. संशोधन कसे असावे, हे सांगतानाच त्यांनी निरपेक्ष कर्मयोगाचा संदेशही दिल्याचे ते म्हणाले. मुकुल कानिटकर यांनी धर्मपालांचे साहित्य लोकांपर्यंत पोहोचण्याची गरज प्रतिपादित केली. त्यासाठी शासनाने आपल्या सर्व ग्रंथालयांत या पुस्तकांचा समावेश करावा, असे आवाहन करतानाच हा कार्यक्रम भारतीय शिक्षण मंडळाच्या वैचारिक आंदोलनाचा ‘श्रीगणेशा’ असल्याचेही ते म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष महेश दाबक यांनी प्रास्ताविक केले. वामनराव गोगटे यांनी मनोगत व्यक्त केले. धर्मपालांनी दोनशे वर्षांपूर्वीच्या भारताविषयीचे सर्व क्षेत्रांतील अज्ञान दूर करण्याचे काम केल्याचे ते म्हणाले. प्रारंभी पुरुषोत्तम हायस्कूलच्या गीतमंचाने ईशवंदना सादर केली. कार्यवाह धनंजय कुलकर्णी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)