चिमुकल्यांच्या ‘खजिन्या’त ३० देशांचे ‘धन’

By Admin | Updated: March 26, 2017 23:03 IST2017-03-26T23:03:25+5:302017-03-26T23:03:40+5:30

वडांगळी : वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील सातवीत शिकणाऱ्या चार चिमुकल्यांनी देश-विदेशातील दुर्मीळ नाणी व नोटांचा संग्रह करून आनंद लुटला आहे

'Dhan' from 30 countries | चिमुकल्यांच्या ‘खजिन्या’त ३० देशांचे ‘धन’

चिमुकल्यांच्या ‘खजिन्या’त ३० देशांचे ‘धन’

वडांगळी : एका ‘क्लिक’सरशी जगभरातील कोणत्याही विषयावरील सर्व माहिती सहज उपलब्ध होण्याचा हा इंटरनेटी जमाना. अशाही काळात जगभरातल्या एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण, महत्त्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या कुतूहलाचा विषय असलेल्या एखाद्या गोष्टीचा प्रत्यक्ष संग्रह करणे, तो तन मन धनाने वाढविणे, कौतुकाने इतरांना दाखविणे व त्यांच्याकडून ‘व्वा शाब्बास, फारच छान’ अशा विस्मयभरीत प्रतिक्रियांनी पाठ थोपटून घेणे यात मिळणारा आनंद काही औरच! विद्यार्थी दशेत तर असं काही करणं जेवढं अवघड त्याच्या पेक्षाही त्यापासून मिळणारा आनंद कित्येकपट मोठा. वडांगळी येथील न्यू इंग्लिश स्कूलमधील सातवीत शिकणाऱ्या चार चिमुकल्यांनी देश-विदेशातील दुर्मीळ नाणी व नोटांचा संग्रह करून हा आनंद भरभरून लुटला आहे. नीलेश खुळे, सर्वेश खुळे, आयुष खुळे व समर्थ खुळे हे त्या चार छंद वेड्या विद्यार्थ्यांची नावे. आजीच्या कमरेच्या पिशवीत मिळालेल्या शिवराईपासून हा छंद जोपासण्याची कल्पना प्रथम नीलेशला सुचली व पुढे त्याला इतर वर्गमित्रांची साथ मिळाली. ‘वाढता वाढता वाढे...’ या पद्धतीने आज त्यांच्याकडे ३० देशांच्या सुमारे पंधराशे नाणे-नोटांचा संग्रह जमला आहे. प्रारंभी ‘पोरखेळ’ म्हणून दुर्लक्ष झालेल्या या छंदाला आता या चिमुकल्यांच्या पालकांचीही चांगलीच साथ मिळत आहे.  आपले मित्र, पाहुणे, शिक्षक, नोकरी व्यवसायानिमित्ताने परदेशात राहणारे नागरिक यांच्याशी संपर्क साधून, यात्रा, लग्नसमारंभ यात पायपीट करून आपल्या छंदाची इतरांना माहिती देत या  चिमुकल्यांनी ही नाणी जमा केली आहेत.  आज त्यांच्या संग्रहात शिवाजी महाराजांच्या काळातील शिवराई, ईस्ट इंडिया कंपनीचे १८३९ मधील नाणे, क्वॉर्टर आना, हाफ आना, बांगलादेशचा टका, म्यानमारचा टक्का, पाकिस्तान, नेपाळ, मॉरिशस यांचा रुपया, अमेरिका, जपान, मलेशिया, हॉँगकॉँग या देशांचा डॉलर, कतारचा रियल, थायलंडचा थाईबट, इंडोनिशियाचा रुपीच, सौदी अरेबियाचा धीराम, चीनचा युआन, ग्रीसचा लिप्टन,  यूरोपचा यूरो, आफ्रिकेचा रेंड, इंग्लंडचा पौंड व पेन्स, जर्मनीचा मार्क, सिंगापूर, बोर्निओ, कॅनडा, जरसी या देशांचा सेंट, फिलीपीन्सचा पिसो, फ्रान्स बीलगुई, डेन्मार्कचा कॉर्नर आदि चलनांचा समावेश आहे.  किंग जॉर्ज पाचवा याच्या काळातील चांदीचा रुपयाही या संग्रहात दिसतो. आज
भारतीय चलनात नसलेले  एक पैसा, दोन पैसे, तीन पैसे आदी नाणीही या संग्रहात आहे. नुकत्याच ‘कागज का टुकडा’ ठरलेल्या
पाचशे व हजारच्या नोटाही या संग्रहात दिमाखाने मिरवत आहेत. (वार्ताहर)
सर्वच देशांची नाणी जमविणार असल्याचा निर्धार
चिमुकल्यांनी जमा केलेल्या या खजिन्याचे प्रदर्शन नुकतेच विद्यालयात भरविण्यात आले होते. अभ्यास सांभाळून संग्रह जोपासण्याच्या विद्यार्थ्यांच्या या प्रवृत्तीचे विद्यार्थी व शिक्षकांनी कौतूक केले. प्राचार्य शरद रत्नाकर, पर्यवेक्षक विलास कर्डक, राजेंद्र भावसार, दीपक भालेराव व वर्गशिक्षकांनी या विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. जगातील सर्वच देशांची नाणी आम्ही जमवणार असल्याचा निर्धार या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला व कोणाकडेही अशा प्रकारची नाणी असतील तर आम्हाला द्यावीत असे आवाहनही त्यांनी केले आहे.


 

Web Title: 'Dhan' from 30 countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.