मनमाडच्या गुरुद्वारातील पंजाबचे भाविक रवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2020 23:51 IST2020-05-07T20:48:01+5:302020-05-07T23:51:03+5:30
मनमाड : येथील गुरु द्वारामध्ये लॉकडाउनमुळे अडकलेल्या पंजाबमधील १३० भाविकांना त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले. गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग यांच्या हस्ते झेंडा दाखवून चार बस पंजाबकडे मार्गस्थ झाल्या.

मनमाडच्या गुरुद्वारातील पंजाबचे भाविक रवाना
मनमाड : येथील गुरु द्वारामध्ये लॉकडाउनमुळे अडकलेल्या पंजाबमधील १३० भाविकांना त्यांच्या मूळगावी रवाना करण्यात आले. गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग यांच्या हस्ते झेंडा दाखवून चार बस पंजाबकडे मार्गस्थ झाल्या.
पंजाब प्रशासनाकडून पत्रान्वये महाराष्ट्र राज्य शासनाकडे मनमाडमध्ये अडकलेल्या भाविकांना पंजाबमध्ये पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती करण्यात आली होती. या मागणीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांशी समन्वयातून मनमाड येथील भाविकांना पंजाब राज्यात परतण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
पंजाबमधून ज्या बसेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणण्यात आले होते. त्या बसेसच्या माध्यमातून सर्व भाविकांना आपल्या मूळगावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. या सर्व भाविकांची पंजाबमध्ये जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. या भाविकांना मध्य प्रदेश, राजस्थान यामार्गे पंजाबमध्ये पाठविण्यात आले आहे.
तसेच पंजाबमध्ये पोहोचल्यानंतर या सर्व नागरिकांना १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे. यावेळी मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेणकर, पोलीस उपविभागीय अधिकारी समर सिंग साळवे आदी उपस्थित होते. यासाठी मनमाड गुरुद्वाराचे मुख्य प्रबंधक बाबा रणजित सिंह जी, धनंजय कमोदकर, रणजीत सिंग आनंद, मोहिता नारंग, बलजित सिबल व पंजाबी असोसिएशन यांनी प्रयत्न केले.