शाही मिरवणुकीतून फुलणार भक्तीचा मळा
By Admin | Updated: August 29, 2015 00:25 IST2015-08-29T00:24:42+5:302015-08-29T00:25:04+5:30
सकाळपासून प्रारंभ : साधूंचे रथ, मर्दानी खेळ ठरणार आकर्षण

शाही मिरवणुकीतून फुलणार भक्तीचा मळा
शाही मिरवणुकीतून फुलणार भक्तीचा मळासकाळपासून प्रारंभ : साधूंचे रथ, मर्दानी खेळ ठरणार आकर्षणनाशिक : फुलांनी सुशोभित केलेले रथ, उंट-घोड्यांवर विराजमान साधू-महंत, श्री महंत-महंतांची पाचशेहून अधिक वाहने, भजन-संकीर्तन करणारे तीस ते चाळीस हजार साधू... डोळ्यांचे पारणे फेडणारे मर्दानी खेळ, बॅण्डपथकाची धामधूम अशा भारलेल्या वातावरणात शनिवारी (दि. २९) कुंभमेळ्याच्या शाहीस्नानानिमित्त सकाळी ६ वाजता साधू-महंतांची शाही मिरवणूक निघणार आहे.
कुंभमेळ्यात साधूंच्या शाहीस्नानापाठोपाठ सर्वाधिक आकर्षण असते ते स्नानापूर्वी निघणाऱ्या शाही मिरवणुकीचे. साधुग्राम निवासी वैष्णवपंथीय साधूंचे आखाडे इष्टदेवतांना घेऊन मिरवणुकीने एकापाठोपाठ शाहीस्नानासाठी पवित्र रामकुंडाकडे रवाना होतात. साधूंच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या या मिरवणुकीला ‘शाही मिरवणूक’ म्हटले जाते. या मिरवणुकीची तयारी साधुग्राममध्ये रात्रभर सुरू होती. शनिवारी पहाटे साधू स्नान करून इष्टदेवतांसह मिरवणुकीत सहभागी होतील. निर्वाणी अनी, दिगंबर अनी व निर्मोही अनी असा आखाड्यांचा मिरवणुकीतील क्रम राहणार आहे. साधुग्राममधील लक्ष्मीनारायण मंदिरापासून सकाळी ६ वाजता निर्वाणी अनी आखाड्याची मिरवणूक निघेल. ६.३० वाजता दिगंबर अनी, तर ७ वाजता निर्मोही अनीच्या मिरवणुकीला प्रारंभ होईल. प्रत्येक आखाड्याच्या मिरवणुकीत दोनशे मीटरचे अंतर राहणार आहे. लक्ष्मीनारायण मंदिर, काट्या मारुती पोलीस चौकी, गणेशवाडी देवी चौक, पंचवटी आयुर्वेदिक कॉलेज, गौरी पटांगण, म्हसोबा पटांगण, सरदार चौक या मार्गे मिरवणूक रामकुंडावर पोहोचेल. तेथे निशाण व इष्टदेवतेचे विधिवत पूजन केले जाईल. इष्टदेवता हनुमानाला स्नान घातले जाईल. त्यानंतर आखाड्याच्या प्रमुख श्री महंतांचे व नंतर साधूंचे स्नान होईल. स्नानानंतर ज्या क्रमाने आखाडे दाखल झाले, त्याच क्रमाने ते परतीच्या मार्गाने साधुग्रामकडे रवाना होतील. दरम्यान, शाही मिरवणुकीची शुक्रवारी साधुग्राममध्ये जय्यत तयारी सुरू होती. खालशांच्या वतीने महंतांची वाहने फुलांनी सजवली जात होती. (प्रतिनिधी)