नाथांच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 04:32 PM2021-01-30T16:32:00+5:302021-01-30T16:53:53+5:30

त्र्यंबकेश्वर : दरवर्षी पौष वद्य एकादशीला भरणारी संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आलेली असली तरी नाथांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गावागावांहून भाविकांच्या दिंड्या मोजक्या संख्येने का होईना त्र्यंबकनगरीत दाखल होत आहेत. त्यामुळे शहरात नाथांचा गजर ऐकायला मिळत आहे.

Devotees flock to see Nath | नाथांच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ

मुखी नाथांच्या नामाचा गजर - त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा रद्द झालेली असली तरी मोजक्या भाविकांच्या दिंड्या शहरात दाखल होत आहेत.

googlenewsNext
ठळक मुद्देत्र्यंबकेश्वर : यात्रा रद्द केली तरी दिंड्या सुरूच

त्र्यंबकेश्वर : दरवर्षी पौष वद्य एकादशीला भरणारी संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आलेली असली तरी नाथांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गावागावांहून भाविकांच्या दिंड्या मोजक्या संख्येने का होईना त्र्यंबकनगरीत दाखल होत आहेत. त्यामुळे शहरात नाथांचा गजर ऐकायला मिळत आहे.

दरवर्षी दशमी, एकादशी व द्वादशी अशी तीन दिवस यात्रा भरते. पण यात्रेची तयारी जिल्हा प्रशासन, त्र्यंबक नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांच्याकडून अगोदरपासूनच सुरू होते. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संभाव्य गर्दी लक्षात घेऊन संत निवृत्तीनाथ महाराज यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु, यात्रा रद्द करण्यात आली, तरी वारकरी व भाविकांचा मोजक्या संख्येने का होईना शहराकडे ओघ सुरू आहे. वारकऱ्यांनी दरवर्षीची परंपरा मोडीत काढली नाही. दि. ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान ही यात्रा होणार आहे. यात्रेचा मुख्य दिवस ७ फेब्रुवारी रोजी आहे. परंतु यंदा यात्रा भरण्याऐवजी केवळ धार्मिक नित्यक्रम पार पाडले जाणार आहेत. दरवर्षी यात्रेसाठी महाराष्ट्रभरातून शेकडो दिंड्या त्र्यंबकनगरीत येत असतात. एक दिवस मुक्काम करत दुसऱ्या दिवशी सकाळी प्रदक्षिणा करत परतीच्या मार्गाला लागत असतात. यंदा भाविकांच्या संख्येवर मर्यादा आल्याने मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत टाळ-मृदंगाच्या गजरात दिंड्या दाखल होत आहेत.

आम्ही संगमनेर परिसरातील एका खेडेगावातून आलो आहोत. यात्रेला येण्याची आमची वर्षानुवर्षांची परंपरा आहे. ही परंपरा मोडू नये म्हणून आम्ही दर्शन घेऊन आज मुक्काम करू आणि उद्या प्रदक्षिणा करून परतीच्या मार्गाला लागू. दिंडीत मात्र कोरोनाविषयक नियमांचे पालन केले जात आहे. घोळका न करता एकमेकांत अंतर राखले जात आहे.
- सदाशिव पाटील, दिंडीचालक.

 

Web Title: Devotees flock to see Nath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.