दक्षिणेश्वरी महाकालीचे भाविक नाशिक दर्शनाला...

By Admin | Updated: October 12, 2016 23:45 IST2016-10-12T23:44:07+5:302016-10-12T23:45:53+5:30

पदयात्रा : शिमल्याच्या तीनशे भाविकांचे रामकुंडावर स्नान

The devotees of Dakshineswari Mahakali will visit Nashik ... | दक्षिणेश्वरी महाकालीचे भाविक नाशिक दर्शनाला...

दक्षिणेश्वरी महाकालीचे भाविक नाशिक दर्शनाला...

नाशिक : हिमाचल प्रदेश राज्यातील शिमला शहरापासून तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या ढली येथील दक्षिणेश्वरी महाकाली देवीचे भाविक नाशिक भेटीला आले आहे. सुमारे तीनशे आबालवृध्द भाविकांनी रामकुंडावर स्नान केले.
कोलकात्याच्या दक्षिणेश्वरी महाकाली देवीचे मंदिर काही वर्षांपूर्वी शिमला जिल्ह्याच्या ढली शहरात उभारण्यात आले आहे. शिमला जिल्ह्याचे हे प्रसिद्ध धार्मिक पर्यटनस्थळ असून या ठिकाणी दरवर्षी यात्रा भरते. येथील सुमारे तीनशे महिला, पुरुष यात्रेकरू महाकाली देवीची पालखी घेऊन नाशिकमध्ये रविवारी (दि. ९) पोहोचले. दरवर्षी ही पालखी भारतातील विविध शहरांमध्ये भ्रमंती करत असते.
नाशिकमध्ये प्रथमच ही पालखी आली. त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, शिर्डी, शनिशिंगणापूर, घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन सध्या हे सर्व भाविक पालखीसह पंचवटी परिसरातील कैलास मठामध्ये मुक्कामी आहे. महाकाली देवीचा जयघोष करत हे सर्व भाविक पारंपरिक पोशाखामध्ये पंचवटी परिसरात सकाळी देवदर्शनासाठी पालखी घेऊन निघाले.
महाकाली देवीचे भजन करत हा तीनशे भाविकांचा जत्था काळाराम मंदिरात पोहोचला. पारंपरिक पोशाखात महिलांनी डोक्यावर घेतलेल्या आकर्षक कळसाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
या भाविकांनी रामकुंडावर स्नान केल्यानंतर मुंबईनाका येथील कालिकादेवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. येत्या शुक्रवारी हे सर्व भाविक शिमल्याकडे रवाना होणार आहेत.

Web Title: The devotees of Dakshineswari Mahakali will visit Nashik ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.