ग्रहण काळात रामकुंडात भाविकांनी केले जप, स्नान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 00:02 IST2020-06-21T22:27:20+5:302020-06-22T00:02:30+5:30
नाशिक : खंडग्रास सूर्यग्रहणाच्या काळात सकाळच्या सुमारास भाविकांनी रामकुंडात स्नान केले तर नदीकाठावरही अनेकांनी जपतप केले. सूर्यग्रहण सुरू झाल्यापासून गोदाकाठ परिसरात मंत्रजापाचे स्वर घुमू लागले होते. भगवे, पांढरे वस्त्र परिधान केलेल्या साधू-महंताबरोबरच धार्मिक पूजापाठ करणाऱ्या भाविकांनी रामकुंडात स्नान करून सूर्यदेवतेला नमन केले.

ग्रहण काळात रामकुंडात भाविकांनी केले जप, स्नान
नाशिकमध्ये सूर्यग्रहण काळात रामकुंडात स्नान व मंत्रोच्चाराचा जप करताना भाविक.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : खंडग्रास सूर्यग्रहणाच्या काळात सकाळच्या सुमारास भाविकांनी रामकुंडात स्नान केले तर नदीकाठावरही अनेकांनी जपतप केले. सूर्यग्रहण सुरू झाल्यापासून गोदाकाठ परिसरात मंत्रजापाचे स्वर घुमू लागले होते. भगवे, पांढरे वस्त्र परिधान केलेल्या साधू-महंताबरोबरच धार्मिक पूजापाठ करणाऱ्या भाविकांनी रामकुंडात स्नान करून सूर्यदेवतेला नमन केले. त्याचप्रमाणे काठावर बसून अनेकांनी सूर्याच्या दिशेला अर्घ्य देत पूजापाठ केले.
सूर्यग्रहणाबाबत अनेक मतप्रवाह असल्याने धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून खंडग्रास सूर्यग्रहणाकडे पाहिले गेले. त्यामुळे गोदाकाठ परिसरात भाविकांची गर्दी दिसून आली. परिसरातील मंदिरातील पुजारी, साधू यांनी पहाटेच जपतपला सुरुवात केली. कुणी कुटुंबासह तर कुणी आपल्या भक्तांसह रामकुंडावर स्नानाचे पुण्यकर्म केले. पहाटेपासून सुरू झालेला मंत्रोच्चार उत्तरोत्तर वाढत गेला. ग्रहणाची वेळ दुपारी १ वाजेपर्यंत असल्याने भाविकांची गर्दी वाढतच गेली.
लॉकडाऊनमुळे सध्या मंदिरे बंद असल्याने नेहमी गोदाकाठावर घुमणारा मंत्रोच्चार, आरती आणि घंटानाद बंद झाला असला तरी ग्रहणाच्या निमित्ताने संपूर्ण गोदाकाठ परिसरात मात्र आज मंत्रोच्चार घुमला. सकाळच्या सुमारास काही प्रमाणात ऊन असले तरी त्यानंतर बराच वेळ आकाशात ढग दाटून आल्याने सूर्यग्रहण अनेकांना पाहता आले नाही.