फडणवीसांच्या दाव्याने शिंदे गटात घालमेल, नाशकातील खासदाराचं वाढलं टेन्शन
By श्याम बागुल | Updated: August 30, 2022 20:19 IST2022-08-30T20:17:49+5:302022-08-30T20:19:18+5:30
नाशिकची जागा गमावणार : राजकीय चर्चेला उधाण

फडणवीसांच्या दाव्याने शिंदे गटात घालमेल, नाशकातील खासदाराचं वाढलं टेन्शन
नाशिक : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी बारामती येथे भेट दिली असली तरी, भाजपाचे मिशन बारामतीच नव्हे तर महाराष्ट्र आहे, असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गोटात गेलेल्या शिवसेनेच्या खासदारांची घालमेल वाढली आहे. भाजपाच जर लोकसभेच्या सर्व जागा लढवणार तर राजकीय भवितव्याचे काय असा प्रश्न खासदार हेमंत गोडसे यांच्या समर्थकांना पडला आहे.
नाशिक येथे महानुभाव मेळाव्यासाठी आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रसार माध्यमांनी संपर्क साधला असता, त्यांनी बाबा रामदेव यांच्याशी आपली झालेली भेट ही निव्वळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे हे बारामती दौऱ्यावर असल्यामुळे भाजपाचे मिशन बारामती सुरू आहे काय या प्रश्नावर बोलतांना फडणवीस यांनी भाजपाचे मिशन संपुर्ण महाराष्ट्र असल्याचे सांगून अधिक बोलण्यास नकार दिला. फडणवीस यांच्या विधानाचे अनेक अर्थ काढले जात असून, नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला समर्थन दिले आहे. साहजिकच हे समर्थन देतांना गोडसे यांनी आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपल्या उमेदवारी ची तजवीज करून ठेवली आहे. मात्र, फडणवीस यांच्या म्हणण्यानुसार भाजपाचे महाराष्ट्र मिशन असेल तर नाशिकची जागा शिंदे गटाला गमवावी लागते की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. फडणवीस यांच्या म्हणण्याचा अर्थ नाशिकची जागा भाजपाच लढवेल असा काढला जात असल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाची नेमकी भूमिका काय असेल यावर चर्चा झडू लागली आहे.