जि.प.च्या मालमत्तांचा बीओटीवर विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:36 IST2021-02-05T05:36:38+5:302021-02-05T05:36:38+5:30
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत याविषयावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या सभेत ...

जि.प.च्या मालमत्तांचा बीओटीवर विकास
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या मालमत्तांचा शोध घेऊन त्यातून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करावेत याविषयावर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा, स्थायी समितीच्या सभेत अनेक वर्षांपासून चर्चा केली गेली. त्यावर अगोदर मालमत्तांचा शोध घेण्याची मागणीही सदस्यांकडून वेळावेळी करण्यात आली होती. मात्र, ही चर्चा त्या त्यावेळी कागदावरच राहिली. गेल्या सभेत मात्र याबाबतची चर्चा झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मालमत्तांचा शोध घेण्यासाठी पाच सदस्यीय समिती गठीत करून त्याआधारे शोध घेण्याच्या सूचना केल्या. या समितीचा शोध पूर्ण झाला असून, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शोध घेतला असता अनेक ठिकाणी मोक्याच्या जागा वर्षानुवर्षे पडून असल्याचे स्पष्ट झाले. अनेक वर्षे या जागांची देखभाल न झाल्याने काही ठिकाणी अतिक्रमणही झाल्याचे लक्षात आले आहे. नाशिक शहरातच चार ते पाच जागा मोक्याच्या असून, त्यात महात्मा गांधी रोड, कन्या शाळा, कॉलेजरोड, पशुसंवर्धन विभागाच्या जागांचा समावेश आहे. निफाड शहरात देखील अशाच प्रकारच्या रोडफ्रंट जागा वर्षानुवर्षे पडून असल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक तालुक्यात दोन ते तीन जागा मोक्याच्या आहेत. या जागांचा विकास करून त्याआधारे जिल्हा परिषदेला कायमस्वरूपी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होऊ शकतात अशी शोध समितीने शिफारस केली आहे. त्यात प्रामुख्याने काही जागा बांधा, वापरा व हस्तांतरण करा या तत्वावर खासगी विकासकांकडून विकसित करण्याचे तर काही जागा जाहिरात फलकांसाठी वापरण्यास देऊन त्याआधारे उत्पन्न मिळविण्याची योजना आहे.
चौकट===
विकासकांकडून मागविणार प्रस्ताव
मोक्याच्या जागा विकसित करण्यासाठी खासगी विकासकांकडून प्रस्ताव मागविण्यावर जिल्हा परिषद प्रशासन विचार करीत असून, त्यासाठी विकासक निश्चित करण्यासाठी लवकरच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.