अंध असूनही ती जिद्दीने बनली डॉक्टर!

By Admin | Updated: January 3, 2017 01:22 IST2017-01-03T01:21:53+5:302017-01-03T01:22:13+5:30

क्रितीका पुरोहितची यशोगाथा : सावित्रीच्या लेकीने प्रतिकूल परिस्थितीत घेतली पदवी

Despite being a blind person, he became a stubborn doctor! | अंध असूनही ती जिद्दीने बनली डॉक्टर!

अंध असूनही ती जिद्दीने बनली डॉक्टर!


सावित्रीबाई फुले
जयंती दिन विशेष

भाग्यश्री मुळे : नाशिक
लुई ब्रेल हेलन केलर यांनी ब्रेल लिपीच्या सहाय्याने अंधांना शिक्षण व इतर कौशल्याची दारे खुली करून दिल्यानंतर आजवर अनेकांनी पदवी, पदव्युत्तर शिक्षण, कौशल्य शिक्षण घेत स्वत:ला सिद्ध केले. आपल्यातील कमतरतेवर मात करीत अर्थार्जन करून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा मार्ग सन्मानाने प्राप्त केला. याच सन्मानार्थींच्या यादीत आता महिला डॉक्टर असल्याचा दावा केला जात असलेल्या मुंबईच्या क्रितीका पुरोहित हिने मानाचा तुरा रोवला आहे. भारतातील त्या पहिल्या अंध महिला डॉक्टर असल्याचा दावा अंध कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्यांनी केला आहे.
महिलांना शिक्षणाची कवाडे उघडी करून देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी कठोर संघर्ष केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज सावित्रीच्या लेकी मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. जिल्हाधिकारी, प्राध्यापक, वकील अशा अनेक क्षेत्रात स्वत:च्या बुद्धिमत्तेने चमकदार कामगिरी करणाऱ्या अंध बांधवांपैकी कुणी आजवर वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश केलेला नव्हता. क्रितीकाच्या रूपाने आता वैद्यकीय क्षेत्रात नवा तारा उदयास आला आहे. तिने तिच्या या कामगिरीने सुखद धक्का दिला असून दृष्टीबाधितांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
नालासोपारा येथील रहिवासी आणि १ जानेवारी १९९३ ला जन्मलेली क्रितिका जन्मत:च अंध नव्हती. मात्र वयाच्या आठव्या वर्षी निसर्गाने तिच्यावर आघात केला. तोपर्यंत म्हणजे आठ वर्ष तिने जग पाहिले. त्या आठवणींवर आजही ती जगते आहे. ती तिसरीत असताना तिच्या दृष्टीपटलाची नर्व्हस सिस्टीम डॅमेज झाली आणि तिला अंधत्व आले. जे वाट्याला आले त्याचा स्वीकार करीत ती व तिच्या कुटुंबीयांनी पुढे जाण्याचा निर्धार केला. आठवीपर्यंत ती इंग्रजी माध्यमिक शाळेत शिकत होते. अंधत्व आल्यानंतर तिला अंधांच्या शाळेत टाकण्याविषयी हालचाली सुरू झाल्या पण तिला इंग्रजी माध्यमातच शिकायचे होते. त्यामुळे संस्थाचालकांचे मन वळवीत बीपीएम हायस्कूल, खार (वेस्ट) येथे तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तिला दहावीला ८२ टक्के तर बारावीला ६५ टक्के गुण मिळाले होते.   डॉक्टर होण्यासाठी तिने सी.ई.टी. परीक्षा दिली. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत असलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी तिने प्रयत्न केला मात्र याठिकाणी अपयश आले. मुंबईच्या सेठ जी. एस. मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळवण्यासाठी ती धडपडू लागली. त्यासाठी तिला याचिका दाखल करीत उच्च न्यायालयाचे दार ठोठवावे लागले. २०१० मध्ये तिला न्याय मिळाला. न्यायालयाच्या आदेशानुसार तिला मेडिकल कॉलेजला प्रवेश मिळाला. प्रवेश तर मिळाला पण पुढे काय असा प्रश्न होताच. तिच्या आईने यात तिला सर्वतोपरी मदत केली. तिच्या आईने अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके वाचून काढली आणि सर्व शैक्षणिक साहित्य ध्वनिमुद्रित रेकॉर्ड केले. परीक्षेच्या वेळीही ती क्रितिकाला सर्व वाचून दाखवायची. परीक्षेच्या वेळी कृतिकाने लेखनीकही घेतला होता. प्रॅक्टीकललाही तिने सहकाऱ्याची मदत घेतली. तिने वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केला. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात कुलगुरूंनी तिचे विशेष कौतुक केले.





 

Web Title: Despite being a blind person, he became a stubborn doctor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.