कोपरी-धोतर पेहरावात अवतरले विधानसभेचे उपाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 01:48 IST2020-10-19T22:33:16+5:302020-10-20T01:48:29+5:30
नाशिक : विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरी-पेठ विधानसभेचे आमदार नरहरी झिरवाळ हे आपल्या मिश्किल स्वभावाने जसे परिचित आहेत तसेच ते साध्या व पारंपरिक राहणीमानामुळेही चर्चेत असतात. कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यावर यशस्वीपणे मात करून पुन्हा जनसेवेत दाखल झालेल्या झिरवाळ यांनी मतदारसंघातील एका छोटेखानी सभेला संबोधित करताना चक्क कंबरेला धोतर, अंगात कोपरी व डोक्यावर मुंडासे असा वेश परिधान करत लक्ष वेधून घेतले.

कोपरी आणि धोतर असा पेहराव करत जनतेशी संवाद साधताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ.
नाशिक : विधानसभेचे उपाध्यक्ष आणि दिंडोरी-पेठ विधानसभेचे आमदारनरहरी झिरवाळ हे आपल्या मिश्किल स्वभावाने जसे परिचित आहेत तसेच ते साध्या व पारंपरिक राहणीमानामुळेही चर्चेत असतात. कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यावर यशस्वीपणे मात करून पुन्हा जनसेवेत दाखल झालेल्या झिरवाळ यांनी मतदारसंघातील एका छोटेखानी सभेला संबोधित करताना चक्क कंबरेला धोतर, अंगात कोपरी व डोक्यावर मुंडासे असा वेश परिधान करत लक्ष वेधून घेतले.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सोमवारी (दि.१९) पेठ तालुक्यातील माळेगाव येथील जोगविहीर मंदिरात नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केलेला शेतकऱ्याचा पारंपरिक पेहराव पाहून उपस्थित शेतकरी व ग्रामस्थही अचंबित झाले. यावेळी, झिरवाळ यांनी पाणी ,रस्ते,वीज औद्योगिक वसाहत यासह अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला. कोरोना काळात नागरिकांनी मास्क, हात धुणे, सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले. याप्रसंगी माजी जि.प. सदस्य भिकाजी चौधरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दामू राऊत, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष गिरीश गावित, माजी सभापती मनोहर चौधरी, महिलाध्यक्ष पुनम गवळी, नामदेव मोहंडकर ,पुंडलिक सातपुते , रामदास गवळी यांचेसह नागरिक उपस्थित होते.
विधानसभेच्या ‘त्या’ भाषणाची चर्चा
नरहरी झिरवाळ यांची विधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी आपल्या खास ग्राम्य भाषेत केलेले भाषण सभागृहात गाजले. या भाषणाची क्लिप सध्या यु ट्यूबवर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. झिरवाळ यांच्या लक्षवेधी कृतीमुळे ते नेहमीच चर्चेत राहत आलेले आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकार स्थापनेच्या नाट्यमय घडामोडीतही झिरवाळ यांनी हिमाचल प्रदेशातून आपली सुटका करून घेतली होती. त्यावेळीही ते चर्चेत आले होते.