देवळा-विठेवाडी रस्त्याची दुरवस्था
By Admin | Updated: August 8, 2014 00:57 IST2014-08-05T20:34:09+5:302014-08-08T00:57:13+5:30
देवळा-विठेवाडी रस्त्याची दुरवस्था

देवळा-विठेवाडी रस्त्याची दुरवस्था
देवळा : देवळा-विठेवाडी रस्त्याचे गतवर्षी केलेले काँक्रीटीकरणाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. वाहनधारकांना कसरत करतच वाहन चालवावे लागत आहे. शिवाजीनगर, विद्यानगर, इंदिरानगर आदि परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे.
देवळा तालुक्यात जुलै महिन्यात खर्डा येथे मुख्यमंत्री दुष्काळ निधीतून झालेले सीमेंट प्लग साखळी बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे निदर्शनास आल्याने हे काम तोडून पुन्हा नवीन करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेच्या नगरपालिका स्थानिकस्तरच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. तसेच या योजनेअंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या सर्व कामांची चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले होते. सीमेंट प्लग बंधाऱ्याचे काम निकृष्ट होण्यास संबंधित ठेकेदार जेवढा जबाबदार आहे, तेवढीच जबाबदारी या कामावर देखरेख करणाऱ्या शाखा अभियंत्यांची व विभागाचीदेखील आहे. देवळा तालुक्यात अनेक ठिकाणी शासनाच्या विविध विभागांमार्फत रस्ते, बंधारे, पूल आदिंची दुरुस्तीची किंवा नवीन काम सुरू आहेत. परंतु या कामांवर संबंधित विभागाचा कर्मचारी देखरेख करताना क्वचित ठिकाणी दिसून येतो. कामावर देखरेख नसल्याने कामाचा दर्जा घसरण्याची शक्यता निर्माण होते.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत देवळा - विठेवाडी रस्त्यावर २७५ मीटर लांबीचे रस्ते काँक्रीटीकरणाचे काम गतवर्षी पूर्ण करण्यात आले. काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यासाठी दोन महिने हा रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आला होता. काळजी घेऊनही रस्ता वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर लवकरच रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले. काँक्रीटची खडी वर उखडून आली. यामुळे वाहन चालवताना अडचण निर्माण होऊ लागली. (वार्ताहर)