कर्मचारी बाधित सापडल्यामुळे देवळा नगरपंचायतीचे कामकाज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 13:48 IST2020-07-04T13:48:40+5:302020-07-04T13:48:57+5:30
देवळा : येथील नगरपंचायतीचा एक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह सापडल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायतीचे कामकाज १३ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली आहे .

कर्मचारी बाधित सापडल्यामुळे देवळा नगरपंचायतीचे कामकाज बंद
देवळा : येथील नगरपंचायतीचा एक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह सापडल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायतीचे कामकाज १३ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आले असल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली आहे . नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना दहा दिवस होम कोरंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला असून भविष्यात कोरोना रूग्णात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.
आतापर्यंत कोरोना मुक्त असलेल्या तालुक्यात आठवडाभरातच २० कोरोना बाधित रु ग्ण सापडल्यामुळे सर्वत्र काळजीचे वातावरण आहे. शहरात आतापर्यंत १५ कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. नगरपंचायतीच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोना बाधित रु ग्ण सापडलेले शहरातील ओमनगर, ज्ञानेश्वरनगर, नविन रोहीदास नगर, व निमगल्ली परीसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात औषध फवारणी करण्यात आली असून उर्वरीत शहरातही औषध फवारणी करण्यात येणार आहे. प्रतिबंधित भागातील नागरिकांना आर्सेमिक अल्बम गोळयांचे वाटप करण्यात येत आहे. तहसिलदार दतात्रेय शेजुळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, मुख्याधिकारी संदीप भोळे, पोलिस निरीक्षक सुहास देशमुख आदीनी प्रतिबंधित क्षेत्रास भेट देऊन तेथिल नागरिकांना सुचना दिल्या.
-------------------------------
कोरोनासदृश लक्षणे दिसत असलेल्या नागरिकांनी त्वरित जि.प. विद्यानिकेतन येथील कोरोना केअर सेंटरमध्ये जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी. शहरातील नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या संपर्कात येऊ नये. शहरात कोरोनाचा संसर्ग इतरत्र पसरू नये यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी.
-संदीप भोळे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, देवळा