डिझायनर पणत्यांना मागणी
By Admin | Updated: October 13, 2016 23:59 IST2016-10-13T23:54:00+5:302016-10-13T23:59:15+5:30
आली दिवाळी : विविध आकारांचे पर्याय उपलब्ध

डिझायनर पणत्यांना मागणी
नाशिक : ज्याच्या नावातच दीप आहे अशा दिव्यांचा सण अर्थात दिवाळी अवघ्या १४ दिवसांवर येऊन ठेपली असल्याने तिची चाहूल बाजारपेठांमध्ये जाणवू लागली आहे. पंचवटी, मेनरोड, शालिमार आदिंसह उपनगरांतील विविध बाजारपेठांमध्ये साधारणत: अडीचशेहून अधिक प्रकारच्या पणत्या उपलब्ध झाल्या आहेत. कच्च्या मालांच्या किमतीत झालेली वाढ, इंधनाचे वाढलेले दर, मजुरी यात झालेली वाढ यामुळे यंदा पणत्यांच्या किमतीत किंचितशी वाढ झाली आहे.
शंख, कोयरी, मोर, मासा, पान, स्वस्तिक, दीपमाळ, कासव, कंदील, तुळसी वृंदावन, घर, कलश अशा आकारांतील कलात्मक पणत्या यंदा बाजारात दाखल झाल्या असून प्रत्येकाला आवडीप्रमाणे माती, लाल माती, चिनी माती, टेराकोटा या प्रकारांत पर्याय उपलब्ध होत आहेत. याशिवाय यंदा लाल, चॉकलेटी रंगांबरोबरच सप्तरंगांमध्येही पणत्या मिळत आहेत. पणत्यांच्या जोडीला गुलाब, मोगरा, पॉँड्स, चमेली, सोनचाफा आदि प्रकारांतील सुगंधी मेणबत्त्याही बाजारात दाखल झाल्या आहेत. या ३० ते ३५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.
तरंगणारे दिवे, कंदीलच्या पणत्यांनाही पसंती मिळत आहे. पारंपरिक मातीच्या पणत्यांबरोबरच चिनी माती, क्रिस्टल, प्लॅस्टिकच्या पणत्याही बाजारात लक्ष वेधून
घेत आहेत. याशिवाय विविध बचत गट, सामाजिक संस्थांकडून पणत्यांवर क्रिस्टल, मणी, टिकल्या, लेस आदि साहित्य सजवून कलात्मक पणत्याही विक्रीस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)