मनरेगाची कामे सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 23:17 IST2020-05-05T22:02:42+5:302020-05-05T23:17:19+5:30
त्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली असली तरी हातावर पोट भरणाऱ्या मोलमजुरी करणाºया मजूर-कामगारांचे मात्र कामाअभावी मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत.

मनरेगाची कामे सुरू करण्याची मागणी
त्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली असली तरी हातावर पोट भरणाऱ्या मोलमजुरी करणाºया मजूर-कामगारांचे मात्र कामाअभावी मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. अनेकांवर तर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शासनाने परिसरातील गावे-वाड्या-पाड्यांमध्ये मनरेगाची तसेच जलसंधारणांची कामे हाती घ्यावीत आणि मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
दरवर्षी मजुरांचे स्थलांतर हे केवळ तालुक्यात कामे नसल्या मुळेच होत असते. दिवाळी नंतर हे स्थलांतर होउन साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात हे स्थलांतरित मजूर दोन पैसे गाठीला घेऊनच परत येत असतात. याच पैशातून खरीप लागवडीचा प्रश्न सुटत असतो. पण यावर्षी कोरोनामुळे स्थलांतराचा प्रश्न गंभीर बनलाच शिवाय, जवळ एकही पैसा नसताना उपाशी तापाशी आपली कच्चीबच्ची खांद्यावर घेउन पायी परत माघारी परतण्याची नामुष्की ओढवली. मुंबई, गुजरात, ठाणे, कल्याण आदी भागातून त्र्यंबक तालुक्यातील स्थलांतरित मजूर आपल्या गावी परतले आहेत. गावातही कामे नसल्याने त्यांच्यावर हाताला घडी बांधून बसण्याची वेळ ओढवली आहे.
---------------------------------
तालुक्यातील गावे, वाड्या-पाडे येथील जलसंधारणेची कामे (उदा.) विहिरी, गावतलाव, शेतीचे बांधबंदिस्ती, खड्डे खोदणे, कच्चे रस्ते तयार करणे, रस्त्यालगत गटार खोदणे या कामांना सुरुवात करावी. पाण्याचा स्रोत शोधून विहीर खोदकाम करणे, शेततळे ही कामे प्राधान्यने सुरू केल्यास पाणीटंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. या संबंधी निवेदन तहसीलदारांना दिले आहे. त्याचा त्यांनी गांभीर्याने विचार करावा.
- रघुनाथ घाटाळ, सदस्य, ग्रामपंचायत, मुलवड