आडत, तोलाई बंद करण्याची मागणी
By Admin | Updated: December 23, 2014 00:16 IST2014-12-22T23:21:28+5:302014-12-23T00:16:24+5:30
शेतकऱ्यांची अडवणूक : शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नावालाच

आडत, तोलाई बंद करण्याची मागणी
चांदवड : कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लुबाडणूक कधी थांबणार, असा संतप्त सवाल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक व भाजपाचे नेते विलासराव ढोमसे यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नावाला असतात. आजपर्यत प्रत्येक बाजार समिती ही व्यापाऱ्यांच्या इशाऱ्यावरच चालत आहे.
सर्वच निर्णय व्यापाऱ्यांच्या हिताचे घेतले जातात. म्हणूनच
आडत पद्धती बंद करुन घेईल त्याचीच आडत केली. कृषी
उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही. घेईल त्याची आड पद्धतीमुळे शेतकरी व आडतदार यांचा संबंध संपुष्टात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळण्याऐवजी त्यांची थट्टाच केली जाते.
शेतकरी अडाणी आहे, शेतकऱ्यांला काही समजत नाही असा व्यापाऱ्यांचा समज आहे; परंतु आता शेतकऱ्यांनाही कायद्याचे ज्ञान झाले आहे. म्हणूनच राजरोसपणे चाललेली लूट, मग ती तोलाई हमालीची असो की आडतीची असो, हे शेतकऱ्यांना समजायला लागले आहे. परंतु शेतकरी असंघटित असल्याचा फायदा व्यापारी घेत आहेत.
शासनाने व विशेषत: पणन संचालक डॉ. सुभाष माने यांना शासनाने मुदतवाढ देऊन या
संपूर्ण यंत्रणेवर आळा बसविण्यासाठी निर्णय घ्यावा.
सर्व महाराष्ट्रातील शेतकरी शासनाच्या पाठीमागे उभे राहतील. बाजार समितीच्या संचालक मंडळाने खरेदी-विक्रीमधून लाखोची माया जमा केली आहे, त्याचीही चौकशी पणनमंत्र्यांनी करावी. जशी गुजरातमध्ये कोणतीही कपात होत नाही त्याप्रमाणे निर्णय करावा, अशी मागणी ढोमसे यांनी निवेदनात केली आहे. (वार्ताहर)