ग्रामीण भागात जांभूळ फळाला मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:17 IST2020-07-12T22:59:33+5:302020-07-13T00:17:24+5:30
ग्रामीण भागात सध्या जांभूळ फळाला मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या फळांची मागणी ग्राहक वर्गातून होत असते.

ग्रामीण भागात जांभूळ फळाला मागणी वाढली
लखमापूर : ग्रामीण भागात सध्या जांभूळ फळाला मागणी वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळ्या फळांची मागणी ग्राहक वर्गातून होत असते.
यंदा फळांचा राजा आंबा या फळाला चांगली मागणी होती; परंतु कोरोनामुळे आंब्याची चव आंबट झाली. त्यामुळे आंबा हंगामाचा आता जवळ जवळ शेवट होत असताना, ग्राहक वर्गातून पौष्टिक असलेल्या जांभूळ फळाला मागणी आहे. पावसाळा सुरू झाला की जांभळांना बहर येतो; परंतु यंदा वातावरणातील बदलामुळे बहर कमी आल्यामुळे फळाची आवक कमी प्रमाणात आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने दर वाढले आहेत. आयुर्वेदामध्ये जांभळाला महत्त्वाचे स्थान आहे. शरीरातील जीवनसत्त्व वाढविण्यासाठी हे फळ प्रभावी मानले जाते. तसेच पावसाळी वातावरणात ते खाणे उत्तम मानले जाते.
२० किलोच्या जाळीचा ९०० रुपयांचा दर
दरवर्षी जांभूळ फळ मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत येते; परंतु यंदा हवामानातील बदल तसेच कोरोनामुळे बंद असल्यामुळे फळाची आवक कमी झालेली दिसून येत आहे. गतवर्षी जांभळाची २० किलोची जाळी साधारणपणे ५०० ते ६०० रु पयांपर्यंत विकली गेली यंदा मात्र ७०० ते ९०० रु पये मोजावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
आम्ही दरवर्षी भरपूर प्रमाणात जांभूळ फळपीक घेतो. परंतु यंदा वातावरणातील बदलामुळे झाडाला फळधारणा कमी आहे. यामुळे फक्त २० ते ३० टक्केच फळ हाताशी आले आहे. त्यामुळे शेतीसाठी मिळणारे भांडवलही पुरेशा प्रमाणात मिळू शकले नाही.
- कोंडाजी पिंगळे, जांभूळ उत्पादक