सातव्या वेतन आयोगासाठी वेतनश्रेणी निश्चितीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 23:38 IST2019-12-18T23:38:10+5:302019-12-18T23:38:33+5:30
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करताना राज्य सरकारच्या समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीप्रमाणेच वेतनस्तर लागू करावा, असा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे.

सातव्या वेतन आयोगासाठी वेतनश्रेणी निश्चितीची मागणी
नाशिक : महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करताना राज्य सरकारच्या समकक्ष पदांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीप्रमाणेच वेतनस्तर लागू करावा, असा महापालिका प्रशासनाचा प्रस्ताव आहे. मात्र, मनपातील कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगात ज्याप्रमाणे वेतनश्रेणी लागू करण्यात आली त्याचाच आधार घ्यावा आणि त्यानुसारच वेतनश्रेणी लागू करावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
नागपूर येथे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले. महापालिकेने सर्व कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाºयांचे वेतन हे शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाºयांच्या वेतनापेक्षा अधिक असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता.
महासभेने वेतन आयोग मंजूर करण्याचा निर्णय घेतला असला तरी दरम्यानच्या काळात राज्य शासनाने आॅगस्ट २०१९ मध्ये राज्य शासनातील कर्मचाºयांना लागू असलेल्या वेतनश्रेणीच अन्य समकक्ष पदांना लागू राहतील, असा आदेश जारी केला आहे. त्यामुळे असे न करता पूर्वीप्रमाणेच कर्मचारी नियुक्त करावेत, अशी मागणी सेनेच्या वतीने अध्यक्ष प्रवीण तिदमे आणि सरचिटणीस राजेंद्र मोरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.