संमेलनस्थळाला स्वातंत्र्यवीर सावरकर नाव देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:46 IST2021-02-05T05:46:08+5:302021-02-05T05:46:08+5:30
भगूर : येथील भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, जयप्रकाश जातेगावकर ...

संमेलनस्थळाला स्वातंत्र्यवीर सावरकर नाव देण्याची मागणी
भगूर : येथील भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, जयप्रकाश जातेगावकर यांना नाशिक येथे पुढील महिन्यात होणाऱ्या साहित्य संमेलनात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ अथवा व्यासपीठाला ‘स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर’ असे नाव देण्यात यावे या मागणीसह विविध विषयांवर निवेदन देण्यात आले आहे.
नाशिक नगरी आद्य साहित्यिक, महाकवी स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर यांची जन्मभूमी असून या नगरीत कुसुमाग्रज, वसंत कानेटकर आदी नावांचे एक वलय आहे. त्यापैकी नाशिकचे भूमिपुत्र असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे राष्ट्रीय साहित्यिक, विचारवंत, कवी, लेखक, भाषाशुद्धीकार, उत्कृष्ट वक्ते असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकार्याबरोबरच अनेक ग्रंथ, कादंबऱ्या, पोवाडे, काव्यसंग्रह, वार्तापत्रे व इतर पुस्तकांचे अनुवाद, इतिहास लेखन, भाषाशुद्धी असे सर्वच क्षेत्रांत अद्वितीय कामगिरी केलेली आहे. त्यांच्या कार्यामुळे १९३८ साली मुंबई येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपददेखील त्यांनी भूषविले होते. या वर्षी त्यांच्याच जन्म व कर्मभूमीत होणारे साहित्य संमेलन हा सुवर्णयोग जुळून आलेला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मभूमी असलेल्या भगूर येथील भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाच्या वतीने संस्थापक मनोज कुवर, मंगेश मरकड, डॉ. मृत्युंजय कापसे, योगेश बुरके, प्रशांत लोया, भूषण कापसे आदींनी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची भेट घेत साहित्य संमेलनामध्ये व्यासपीठावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची भव्य प्रतिमा अथवा मूर्ती ठेवून पूजन करावे, सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, असा ठराव साहित्य संमेलनात मांडण्यात यावा, संमेलनादरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मराठी भाषा व साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात यावे, सावरकरांचे समग्र साहित्य जनमानसात पोहोचावे यासाठी विशेष स्टॉलची उभारणी आयोजकांच्या माध्यमातून करण्यात यावी, सावरकरांची जन्मभूमी भगूर तसेच त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली नाशिक व भगूरमधील काही ठिकाणे तसेच त्यांची ग्रंथसंपदा व मराठी साहित्यातील त्यांचे योगदान याबाबत एक ध्वनिफीत संमेलनात दाखविण्यात यावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली.
फोटो कॅप्शन २८सावरकर
सावरकर समूहाच्या वतीने निवेदन देताना मनोज कुवर, डॉ. मृत्युंजय कापसे, संजय करंजकर.