कुलगुरू वायुनंदन यांचे अकाउंट हॅक करून पैशांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST2021-05-12T04:14:58+5:302021-05-12T04:14:58+5:30
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांचे फेसबुक हॅक करून सायबर चोरट्याने त्यांच्या मित्रांशी ...

कुलगुरू वायुनंदन यांचे अकाउंट हॅक करून पैशांची मागणी
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांचे फेसबुक हॅक करून सायबर चोरट्याने त्यांच्या मित्रांशी संवाद साधून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सुदैवाने अशाप्रकारचे संदेश फेसबुक मॅसेंजरच्या माध्यमातून प्राप्त होताच वायुनंदन यांच्या मित्रांनी त्यांचाशी संवाद साधून अशाप्रकारे पैशांची मागणी होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर वायुनंदन यांनी सोशल माध्यमांतून असाप्रकार घडल्याचे स्पष्ट केले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू ई. वायुनंदन यांचे फेसबुुक अकाउंट सोमवारी (दि.१०) सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हॅक करून वायुनंदन यांना तत्काळ काही पैशांची गरज असल्याचे एकाने भासवत ऑनलाइन पैशांची मागणी केली. त्यासाठी सायबर चोरट्याने पीवायटीएम ०१२३४५६ आयएफएश कोड असलेल्या खाते क्रमांक ९१८० ९९६५३०४७ वर पैसे पाठविण्याची विनंती केली. मात्र पैशांची मागणी करणाऱ्या सायबर चोरट्याने अवघ्या आठ ते दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे वायुनंदन यांना जवळून ओळखणाऱ्या त्यांच्या मित्रांना या संदेशांविषयी संशय आल्याने त्यांनी या गोष्टीची वायुनंदन यांना कल्पना दिली. त्यामुळे वायुनंदन यांनी तत्काळ फेसबुक व अन्य सोशल माध्यमांतून आपले फेसबुक अकाउंट हॅक झाले असून, संबंधितांकडून पैशांची मागणी करणारे संदेश पाठविले जात असल्याचे स्पष्ट करीत अशा फेक संदेशांना कोणीही बळू पडू नये, असे आवाहन केले. त्यामुळे सायबर चोरट्यांचा वायुनंदन यांच्या नावाने सामान्य नागरिकांकडून पैसे उकळण्याचा डाव उधळला गेला आहे.
कोट-
फेसबुकवरून पैशांची मागणी करणारे फेक संदेश दिले जात असल्याचे समजताच फेसबुकवरून अशा प्रकारच्या संदेशांना कोणीही बळी पडू नये, असे आवाहन केले. त्यामुळे कोणीही या फेक संदेशांना बळी पडलेले नाही. मात्र असा प्रकार घडणे दुर्दैवी असून, याविषयी संपूर्ण तपशील घेऊन सायबर पोलिसांमध्ये तक्रार करणार आहे. -
-ई. वायुनंदन, कुलगुरू, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
सायबर गुन्हेगारांचा उपद्रव वाढला
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांमध्ये सायबर गुन्हेगारांचा उपद्रव वाढला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप थेटे यांना फोनवरून ईडीचा अधिकारी असल्याचे भासवत खंडणी मागण्याचा प्रकार ताजा असतानाच अवघ्या दोन दिवसांत चक्क कुलगुरूंचेच फेसबुक अकाउंट हॅक करून फेसबुक फ्रेंड्सकरून पैसे मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे नाशिक शहरात सायबर गु्न्हेगारांचा उपद्रव वाढल्याने सायबर पोलिसांसमोर या गुन्हेगारांनी आव्हान निर्माण केले आहे.