कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:57 IST2020-02-12T21:40:07+5:302020-02-12T23:57:17+5:30
शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती विनायक तांबे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

कांदा निर्यातबंदी उठवावी या मागणीचे निवेदन तहसीलदार राहुल कोताडे यांना देताना सिन्नर बाजार समितीचे सभापती विनायक तांबे, सचिव विजय विखे, विठ्ठल उगले, हरिभाऊ तांबे यांच्यासह पदाधिकारी.
सिन्नर : शासनाने कांद्यावरील निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती विनायक तांबे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
बाजार समितीच्या नांदूरशिंगोटे येथील उपबाजारात शुक्रवारी (दि.७) कांदा शेतमालाचे लिलाव शेतकऱ्यांनी काही काळासाठी बंद पाडले होते व बाजार समितीस कांदा निर्यातबंदी उठविण्याबाबत योग्य त्या कार्यवाहीसाठी निवेदन दिले होते. सदर निवेदनाबाबत बाजार समितीने तहसीलदार, सहायक निबंधक यांना निवेदन देऊन कांदा निर्यातबंदी उठविण्याची मागणी केली. निर्यातबंदी उठविण्यासाठी शासनातर्फे प्रयत्न झाल्यास निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. केंद्र शासनाने शेतमालावर आंतरराष्ट्रीय निर्यातबंदी लागू केलेली आहे. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे. निर्यातबंदी उठवून शासनाने सकारात्मक पाऊल उचलावे. स्थानिक बाजारपेठेत कांदा शेतमालाचा डोह होऊन दरात जी घसरण झाली आहे, त्यातून निश्चितच शेतकºयांना दिलासा मिळेल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी सभापती तांबे, विठ्ठल उगले, हरिभाऊ तांबे, राहुल बलक, आर. के. मुंगसे, सचिव विजय विखे, पी. आर. जाधव आदी उपस्थित होते.