अवैध दारू धंदे बंद करण्याची मागणी
By Admin | Updated: February 25, 2015 23:22 IST2015-02-25T23:22:34+5:302015-02-25T23:22:44+5:30
अवैध दारू धंदे बंद करण्याची मागणी

अवैध दारू धंदे बंद करण्याची मागणी
येवला : शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर असलेल्या अंगुलगाव येथे वर्षभरापासून अवैध दारू धंदे बंद करा म्हणून टाहो फोडत असलेल्या महिलांचे गाऱ्हाणे कोणी ऐकून कारवाई करील का? असा सवाल करत अखेरचा पर्याय म्हणून या महिलांनी प्रांताधिकारी वासंती माळी यांना निवेदन दिले आहे.
या प्रकरणी पोलीस व तहसील पातळीवर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. अखेर प्रांताधिकाऱ्यांचे दरवाजे या महिलांनी ठोठावले आहे. आता पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करणार असल्याचे सीताबाई झाल्टे, मालनबाई घोडेराव, शांताबाई झाल्टे, नर्मदाबाई झाल्टे, रंजना कोळी, सविता महिरे यांच्यासह येथील महिलांनी इशारा दिला आहे. दारू पिऊन आल्यानंतर घरात शिवीगाळ करतात. लहान मुलांनादेखील या व्यसनाचा उपद्रव होऊ लागला असल्याने येथील महिला अधिक संतप्त झाल्या आहेत. या गावात दगडखाण असल्यामुळे गरीब मजूर समाज मोठ्या प्रमाणात आहे यातच गेल्या दोन वर्षापासून गारपीट आणि दुष्काळ असल्याने शेतकरीवर्गावरही मजुरी करण्याची वेळ आली आहे. अशातच गावातील दोन अवैध दारू अड्यांमुळे मजुरीचे पैसेदेखील घरापर्यंत पोहोचत नाहीत. यामुळे घराघरात कलह निर्माण होत असल्याने संतप्त महिलांनी सुरुवातीला तालुका पोलिसात या महिलांनी लेखी तोंडी दाद मागितली. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नसल्याचे या महिलांचे म्हणणे आहे.
दरम्यान, येवला तहसीलदार शरद मंडलिक यांचे कार्यालयात या महिलांनी आपली व्यथा निवेदनातून सांगितली. यावर तालुका पोलिसांना या प्रकरणाबाबत कारवाई करण्याचे सांगणार असल्याचे तहसीलदार यांनी सांगितले होते, परंतु आम्ही या पातळीवरही निराश झालो असून, अवैध दारू विक्र ी करणाऱ्यांनी फुकट दारू वाटून आमची तोंडे गप्प करण्याचा प्रयत्न केला. आता आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याचे या महिलांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)