स्वागत कमानी उभारण्याची मागणी
By Admin | Updated: January 19, 2015 00:26 IST2015-01-18T23:35:03+5:302015-01-19T00:26:29+5:30
स्वागत कमानी उभारण्याची मागणी

स्वागत कमानी उभारण्याची मागणी
नाशिक : कुंभमेळ्यांच्या कामांमध्ये कमानीच्या कामाकडे दुर्लक्ष झाले असून, त्या कमानी उभारणाच्या मागणीसाठी शिवसेना पालिका व जिल्हा प्रशासनाकडे मागणी करणार आहे.
बारा वर्षांपूर्वी तत्कालीन महापौरांनी शहराच्या प्रत्येक मुख्य प्रवेशद्वारावर स्वागत कमानी उभारल्या होत्या. त्यावर महापालिकेचे चिन्हदेखील लावण्यात आले होते, मात्र महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कामात आडगाव येथील जिजाऊ माता, विल्होळी मॉसाहेब मीनाताई ठाकरे या ठिकाणच्या कमानी पाडण्यात आल्या. महामार्ग प्राधिकरण विभागाने या कमानी बांधून देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. देश-विदेशांतून येणारे नागरिक पर्यटक व भाविकांना स्वागत कमानीमुळे शहरात प्रवेश करत असल्याचे समजत होते. मात्र कमानीअभावी बहुतांश वाहनधारकांच्या इच्छित ठिकाणी जाताना गोंधळ उडतो. आगामी सिंहस्थात येणाऱ्या भाविकांचा विचार करून महापालिकेने कमानी रंगरंगोटी करून या प्रवेशद्वारांवर महापुरुषांचे नाव द्यावे, अन्य विकास कामासोबत स्वागत कमानी बांधण्याची मागणी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या संदर्भात खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, आमदार शिवाजी सहाणे, जिल्हाप्रमुख विजय करजंकर, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, राजू लवटे, दिलीप मोरे, निवृत्ती मते, मल्हारी मते यांच्यासमवेत मुद्द्यांवर बैठक होणार असून, त्यानंतर निवेदन देण्यात येणार असल्याचे सुनील जाधव यांनी कळविले आहे.