‘बांधावर खत’ योजना सुरू करण्याची मागणी
By Admin | Updated: August 19, 2014 01:20 IST2014-08-18T23:53:09+5:302014-08-19T01:20:57+5:30
‘बांधावर खत’ योजना सुरू करण्याची मागणी

‘बांधावर खत’ योजना सुरू करण्याची मागणी
गुळवंच : कृषी विभागाच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून सुरू करण्यात आलेली शेतकऱ्यांसाठी ‘बांधावर खत’ योजना तालुक्यात प्रभावीपणे सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
तालुका कृषी विभागाच्या आत्मा योजनेंतर्गत तालुक्यात शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आहे. या गटांच्या माध्यमांतून शासनाकडून रास्त दरातील खते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर वितरित करण्याची ही योजना आहे. गटातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्याचा पुरवठा करण्याची योजना आहे. मात्र यंदा सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील शेतकरी गटांना खते उपलब्ध झाली नसल्याने बांधावर सोडाच, परंतु शेतकऱ्यांना खतांसाठी थेट सिन्नर येथे जावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांना शासनाकडून माफक दरात खते मिळावी व विक्रेत्यांकडून होणारी कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये म्हणून थेट कंपनीकडून शेतकरी गटांना खते मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. शेतकरी गटांना शासनाकडून खतांचा पुरवठा करण्यात येतो. तो गटांमार्फत शेतकऱ्यांना थेट बांधावर खत उपलब्ध होते. तथापि, शासनाकडून या गटांना विविध रासायनिक खते उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यात यंदा उशिरा झालेल्या पावसामुळे काही पिकांच्या पेरण्या सुरू असून, विविध भाजीपालावर्गीय पिकांच्या लागवडी करण्यात येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वीच पेरणी केली आहे ती पिके कोळपणी, निंदणीवर आली आहेत. त्यामुळे निंदणी झाल्यानंतर पिकांना खतांची मात्रा देण्याची गरज असते. मात्र खते मिळत नसल्याने पिकांचे पोषण होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)