मृगाची हुलकावणी; दुबार पेरण्यांचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:11 IST2021-06-26T04:11:23+5:302021-06-26T04:11:23+5:30
मानोरी : मृग नक्षत्राने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. संकट सध्या येवला तालुक्यातील ...

मृगाची हुलकावणी; दुबार पेरण्यांचे संकट
मानोरी : मृग नक्षत्राने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावू लागले आहे. संकट सध्या येवला तालुक्यातील शेतकरीवर्गावर ओढावले असल्याचे दिसून आले आहे. येवला तालुक्यात १८ जूनपर्यंत १९ हजार ५९३ हेक्टरवर खरीप हंगामातील पिकांची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
येवला तालुक्यात जून महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आनंदाने तालुक्यातील बहुतांश भागात खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या करण्यास सुरुवात केली होती. मात्र, मागील पंधरा ते वीस दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने अंकुरलेली बीजे पुन्हा कोमेजू लागली आहेत. त्यामुळे पावसाअभावी पिके धोक्यात आली असून, पुढील ४ ते ६ दिवस मुसळधार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे. अनेक ठिकाणी विहिरीला असलेल्या पाण्याचा आधार घेऊन मका, सोयाबीन, टोमॅटो आदी पिके जगविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक, मुखेड, देशमाने, मुखेड फाटा, सत्यगाव, शिरसगाव लौकी, पिंपळगाव लेप आदी परिसरातील बळीराजाला अद्यापही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. मृग नक्षत्र कोरडेठाक गेल्याने, पेरण्या झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. उष्णतेचा फटकाही कोवळ्या बीजांना बसत असून, शेतकऱ्यांवर विहिरीत असलेल्या अल्पशा पाण्याचा वापर करून पिके जगविण्याची नामुष्की ओढावली आहे. तालुक्यात १८ जूनपर्यंत बाजरी- १,८२२ हेक्टर, मका- १२,२४३ हेक्टर, तूर- ५६ हेक्टर, मूग- २,७९९ हेक्टर, उडीद- २८ हेक्टर, भुईमूग- ६८४ हेक्टर, सोयाबीन- १,५५६ हेक्टर, कपाशी (जिरायत) - ४०५ हेक्टर या प्रमाणे पेरण्या झाल्या आहेत.
कोट... मानोरी परिसरात अद्याप मुसळधार पाऊस नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या नसल्याचे आढळून आले आहे. पाऊस समाधानकारक पडल्याशिवाय आणि जमिनीत पुरेशी ओल झाल्याशिवाय शेतकरीवर्गाने पेरणी करण्याची घाई करू नये.
- रमेश वाडेकर, कृषी सहायक