चांदवड उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:14 IST2021-09-25T04:14:39+5:302021-09-25T04:14:39+5:30
चांदवड येथील हा नवा ऑक्सिजन प्लांट लाईट गेला तरी लाईट येईपर्यंत वापरू शकतो. साधारणत: दहा लिटर क्षमतेने जरी एका ...

चांदवड उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण
चांदवड येथील हा नवा ऑक्सिजन प्लांट लाईट गेला तरी लाईट येईपर्यंत वापरू शकतो. साधारणत: दहा लिटर क्षमतेने जरी एका रुग्णावर दिला तरी पन्नास रुग्ण या पन्नास हजार लिटर ऑक्सिजनवर तग धरू शकता अशी क्षमता या जम्बो ऑक्सिजन प्लांटची आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना शासनाने मोठी सोय उपलब्ध करून दिल्याचे पालकमंत्री तथा अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पंकज ठाकरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, विजय जाधव, सुनील कबाडे, प्रकाश शेळके, रिजवान घासी, उत्तम आहेर व्यासपीठावर उपस्थित होते.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी प्रास्ताविकात पीएसए ऑक्सिजन प्लांटची साठवणूक क्षमता पन्नास हजार लिटर असून, दिवसाला ५० ते ६० जंबो सिलिंडर याद्वारे भरली जाऊ शकतात. उपजिल्हा रुग्णालयात ३३ जंबो सिलिंडर्स उपलब्ध असून, आता ऑक्सिजन प्लांट कोरोनाशी सामना करण्यासाठी सज्ज झाला असल्याचे सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना आरोग्यकर्मी व पोलीस यंत्रणांचे योगदान उल्लेखनीय ठरले आहे, असे गौरवोद्गार भुजबळ यांनी काढले.
चौकट...
कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर होती. यात अनेक लोक मृत्युमुखी पडले. या लाटेत रुग्णसंख्या संपूर्ण राज्यात जास्त असल्याने ऑक्सिजन टंचाईचाही सर्वांनाच सामना करावा लागला आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात २९ ठिकाणी ऑक्सिजन जनरेशन प्लांटची उभारणी होत असून, जिल्हा ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
चौकट...
चांदवड तालुक्यात ९ हजार ४५५ रुग्ण बाधित झाले होते. त्यातील ९ हजार ८८ रुग्ण बरे झाले तर ३२८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन जिल्ह्यात सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जंबो सिलिंडर, ऑक्सिजन ड्यूरा सिलिंडर्स, ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर, लिक्विड ऑक्सिजन सिलिंडर्स यांची गरजेनुसार व्यवस्था आज करण्यात आली आहे.
(२४ चांदवड १,२)
१) चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात जम्बो ऑक्सिजन प्लांट उद्घाटनप्रसंगी बोलताना छगन भुजबळ. समवेत अशोक थोरात, शिरीषकुमार कोतवाल, डॉ. सयाजीराव गायकवाड, संजय जाधव, विजय जाधव, प्रकाश शेळके, उत्तम आहेर, रिजवान घासी आदी.
२) चांदवड येथील जम्बो ऑक्सिजन प्लांटची पाहणी करताना छगन भुजबळ.