सीताफळ उत्पादनात घट
By Admin | Updated: October 23, 2015 00:10 IST2015-10-22T23:02:03+5:302015-10-23T00:10:20+5:30
तिळवण : कमी पावसाचा परिणाम

सीताफळ उत्पादनात घट
खामखेडा : इतिहासाची साक्ष देणाऱ्या तिळवण किल्ल्याच्या अवती-भवतीच्या डोंगरदऱ्यात सीताफळाचे मोठ्या प्रमाणात झाडे असून, या झाडांना पावसाळा संपल्यानंतर साधारण आॅक्टोबर महिन्यात पिकलेली सीताफळ बाजारात दाखल होतात. सीताफळ आरोग्यास लाभदायक असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने या परिसरातील आदिवासी ही सीताफळे तोडून ती बाजारात विकून आपली उपजीविका चालवितात.
बागलाण तालुक्यातील तिळवण गावाजवळील तिळवण हा इतिहासकालीन किल्ला आहे. या किल्ल्याच्या भोवताली परिसरातील डोंगरदऱ्यात सीताफळाची फार मोठ्या प्रमाणात झाडी आहे. ही सीताफळे आॅक्टोबर महिन्यात पिकण्यास सुरुवात होते. सीताफळ पोषक आहे. आयुर्वेदातही त्याचे महत्त्व आहे. सीताफळे चविला गोड व स्वादिष्ट असल्याने त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर असते.
तिळवण किल्ल्याच्या पायथ्याशी कळवण तालुक्यातील चाचेर शिवारातील पांढरीपाडा या आदिवासी वस्तीवरील आदिवासीबांधव या दिवसात या डोंगरदऱ्यातून सीताफळे तोडून ती मालेगाव, कळवण, सटाणा येथे विक्रीसाठी घेऊन जातात. सकाळी लवकर या डोंगर परिसरात जाऊन डोळा पडलेले (म्हणजे पिकण्यास योग्य झालेले फळ) फळे तोडून आणून दुसऱ्या दिवशी सात-आठ जण मिळून एक वाहन भाड्याने घेऊन जवळील शहरात विक्रीसाठी नेले जाते. काही व्यापारी थेट या आदिवासी वस्तीवर स्वत:चे वाहन घेऊन जागे सीताफळ खरेदी करतात. (वार्ताहर)