केबीसीवर हिवाळी अधिवेशनात निर्णय
By Admin | Updated: November 22, 2014 00:07 IST2014-11-22T00:06:59+5:302014-11-22T00:07:34+5:30
केबीसीवर हिवाळी अधिवेशनात निर्णय

केबीसीवर हिवाळी अधिवेशनात निर्णय
नाशिक : राज्यातील केबीसी घोटाळ्याची मोठी व्याप्ती असून, हिवाळी अधिवेशनादरम्यान लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची माहिती केबीसी ठेवीदार बचाव संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष करण गायकर यांनी दिली़
केबीसी घोटाळ्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या मागणीचे निवेदन कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांची गुरुवारी भेट घेऊन त्यांना देण्यात आले़ यावेळी त्यांनी अधिवेशनादरम्यान निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे गायकर यांनी सांगितले़ समितीने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केबीसीची व्याप्ती मोठी असून, यातील मुख्य आरोपी भाऊसाहेब चव्हाण व आरती चव्हाण यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही़ तसेच शासनस्तरावर अद्याप काहीच निर्णय न झाल्यामुळे गुंतवणूक करणारे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत, तर सहा ठेवीदारांनी आत्महत्त्या केल्या आहेत़ याबाबत माजी मुख्यमंत्र्यांशी वेळोवेळी चर्चा झाली आहे़ त्यांनी केबीसीची मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव करून ठेवीदारांना रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले होते; परंतु याबाबत पुढे काहीच कार्यवाही झालेली नाही़ पश्चिम बंगालच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ठेवीदारांना त्वरित रक्कम देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे़
यावेळी समितीचे उपाध्यक्ष संजय सावंत, राजेश मोरे, विजय काकडे, विजय वाहुले, अॅड़ अविनाश औटे, अनिल गरड, गिरीश अहेर, नितीन पाटील, विकी धोंडगे आदि उपस्थित होते़ (प्रतिनिधी)