कर्जमुक्त नव्हे, कर्जबाजारी केले!
By Admin | Updated: June 3, 2014 01:54 IST2014-06-03T01:54:08+5:302014-06-03T01:54:08+5:30
नाशिक : नाशिक महापालिकेत खूप कामे केली; परंतु ती लोकांसमोर नीट मांडता आली नाही,

कर्जमुक्त नव्हे, कर्जबाजारी केले!
नाशिक : नाशिक महापालिकेत खूप कामे केली; परंतु ती लोकांसमोर नीट मांडता आली नाही, असे सांगणार्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिकेवरील साडेसहाशे कोटी रुपयांचे कर्ज फेडल्याचा दावा केला खरा; परंतु मनसे सत्तेवर आली तेव्हा अशा प्रकारचे कोणतेही कर्ज पालिकेवर नव्हते. उलट गेल्या दोन वर्षांत मनसेच्या कारकिर्दीत तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे लोकांचा गैरसमज दूर करता करता प्रत्यक्षात राज ठाकरे यांचाच गैरसमज झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत मनसे उमेदवारांचा दारुण पराभव झाल्यानंतर राज ठाकरे यांनी गेल्या शनिवारी सोमय्या मैदान येथे प्रथमच जाहीर सभा घेतली आणि विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. यावेळी नाशिकमध्ये मनसेचे काम समाधानकारक नसल्याने वेळोवेळी होणार्या प्रश्नांच्या सरबत्तीला राज यांनी उत्तर दिले. कारण लोकसभा निवडणुकीत हा कळीचा मुद्दा होता. त्यामुळे राज ठाकरे यांनी नाशिक महापालिकेत खूप कामे झाली आहेत, त्याची फाईल आपल्याकडे असल्याचे सांगताना त्यांनी नाशिक महापालिकेच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीला दोष दिला. दोन वर्षांपूर्वी नाशिककरांनी महापालिकेची सत्ता दिली. त्यावेळी महापालिकेवर साडेसहाशे कोटी रुपयांचे कर्ज होते, ते फेडले आणि इतकेच नव्हे तर यामुळे मोठी विकासकामे करता आली नाही, असा अप्रत्यक्ष दावा राज ठाकरे यांनी केल्याने पालिका वर्तुळातील सारेच जण बुचकळ्यात पडले आहेत. मनसेची सत्ता आली तेव्हा महापालिकेवर साडेसहाशे कोटी रुपयांचे कोणतेही कर्ज नव्हते. महापालिकेने आजवर सर्वाधिक शंभर कोटी रुपयांचे कर्ज कॉँग्रेसच्या शोभा बच्छाव महापौर असताना काढले होते. कर्जरोख्याच्या माध्यमातून काढलेले हे कर्ज शिवसेनेचे दशरथ पाटील महापौर असताना फेडण्यात आले होते. त्यानंतर पालिकेवर आजवर कोणतेही कर्ज नाही. उलट गेल्या दोन वर्षांत महापालिकेची सत्ता आल्यानंतर आधी दोनशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास महापालिकेला मान्यता राज्य शासनाने दिली आणि त्यानंतर अलीकडेच आणखी दीडशे कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास मान्यता शासनाने दिली आहे. त्यानुसार कर्ज काढण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे मनसेने पालिकेला कर्जमुक्त केले नाही, तर कर्जबाजारी करण्याची तयारी सुरू केली आहे. परंतु राज ठाकरे यांच्या मनोगतातून नागरिकांचा गैरसमज दूर होण्यापेक्षा राज यांच्याच गैरसमजाचे दर्शन झाले. (प्रतिनिधी)