सोनांबेत जिलेटीन स्फोटात शेतकऱ्याचा मृत्यू; ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 17:09 IST2019-01-18T17:09:09+5:302019-01-18T17:09:34+5:30
सिन्नर तालुक्यातील सोनांबे शिवारातील बोडके मळा परिसरात विहिरीचे खोदकाम सुरू असताना बाजूला ठेवलेल्या जिलेटीन कांड्यांच्या स्फोटात शेतकरी ठार झाल्याच्या घटनेप्रकरणी विहिरीचे खोदकाम करणाºयाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनांबेत जिलेटीन स्फोटात शेतकऱ्याचा मृत्यू; ठेकेदाराविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
बुधवारी सकाळी सोनांबे शिवारात विहिरीच्या खोदकामासाठी आणलेल्या जिलेटीनचा स्फोट होऊन बाळासाहेब पुंडलिक बोडके (५०) या शेतकºयाचा मृत्यू झाला होता. बोडके यांच्या शेतातील विहिरीचे खोलीकरण सुरू होते. त्यासाठी त्यांनी सुनील अंतू डगळे रा. सोनांबे यांना विहिरीतील खडक फोडण्याचे काम दिले होते. खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग करणे आवश्यक होते. त्यामुळे ठेकेदाराने सोबत जिलेटीनच्या कांड्या आणल्या होत्या. काम दोन दिवस काम बंद असल्याने फायरिंगसाठी आणलेल्या जिलेटीन कांड्यांचा जमिनीत पुरून ठेवण्यात आल्या होत्या. बुधवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास बोडके यांनी शेकोटी पेटवली असता तेथील आजूबाजूची जागा गरम होवून जिलेटीन कांड्यांचा स्फोेट झाल्याचे समजते. या स्फोटात बोडके यांचा मृत्यू झाला होता. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, संशयित सुनील डगळे या ठेकेदाराकडे स्फोटक पदार्थ बाळगण्याचा व वापरण्याचा परवाना नसतांना विहिरीच्या खोदकामासाठी आणलेल्या जिलेटिन कांड्यांमुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो याची जाणीव असतांना ते पुरुन ठेवले. शेतकरी बाळू बोडके यांच्या मरणास कारणीभूत ठरल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एखंडे अधिक तपास करीत आहेत.