देवगाव फाट्यावरील विहिरीत तरुण-तरुणीचा मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:16 IST2021-03-30T23:43:44+5:302021-03-31T01:16:03+5:30

देवगाव : येथील फाट्यानजीकच्या विहिरीत एक तरुण व तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Dead body of a youth in a well on Devgaon fork | देवगाव फाट्यावरील विहिरीत तरुण-तरुणीचा मृतदेह

देवगाव फाट्यावरील विहिरीत तरुण-तरुणीचा मृतदेह

ठळक मुद्देविहिरीत आढळून आलेल्या तरुणाची ओळख पटली

देवगाव : येथील फाट्यानजीकच्या विहिरीत एक तरुण व तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि.२९) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. मृत तरुण हा मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील असून, तरुणी निफाडमधील असल्याचे समजते. सदर प्रकार आत्महत्या की घातपात याचा पोलीस शोध घेत आहेत.

भरवसफाटा, कोळपेवाडी राज्य महामार्ग क्र. ७ वरील देवगाव फाट्यानजीक भाऊसाहेब भीमराव शिंदे यांच्या गट नं. १८६ मधील विहिरीत सोमवारी (दि.२९) सायंकाळी सहा ते सव्वासहा वाजेच्या सुमारास काळा टॉप, पिवळी लेगिन्स, उजव्या हातात घड्याळ, डाव्या हातात कडे, पायात बाजारातील तोरड्या, गळ्यात बाजारू मंगळसूत्र अशा पेहरावातील २२ ते २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर दीड तासाच्या अंतराने सायंकाळी ७.५० वाजेच्या दरम्यान आणखी एका तरुणाचा मृतदेह फुगून वर आला. याबाबत लासलगाव पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल डी.के. ठोंबरे, डी. डी. पानसरे, हवालदार कोते, किशोर वाणी, मत्सागर आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठविला. सदर तरुण व तरुणीने आत्महत्या केली की त्यांची कोणी हत्या केली हे अद्याप गुलदस्त्यात असून, पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत.
तरुणाची ओळख पटली
सदर विहिरीत आढळून आलेल्या तरुणाची ओळख पटली असून, तो मालेगाव तालुक्यातील येसगाव येथील रहिवाशी आहे. सागर वेताळ असे त्याचे नाव असून, तरुणी निफाड येथील रहिवाशी असल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी दिवसभर विहिरीजवळ सदर तरुणाची मोटारसायकल उभी होती, मात्र नंतर ती त्याचे नातलग घेऊन गेल्याचे समजते.

Web Title: Dead body of a youth in a well on Devgaon fork