अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट पोषण आहार

By Admin | Updated: August 12, 2014 02:02 IST2014-08-12T01:38:43+5:302014-08-12T02:02:12+5:30

अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट पोषण आहार

Dangerous nutrition diet in the anganwadi | अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट पोषण आहार

अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट पोषण आहार

 

नाशिक : मालेगाव शहरात महिला व बालकल्याण विभागाकडून अंगणवाड्यांमधील बालकांना पुरविण्यात येणारा पोषण आहार अतिशय निकृष्ट दर्जाचा व अनियमित असल्याने या पोषण आहाराची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी विनंती मालेगावच्या महापौर ताहेरा शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
यासंदर्भात शेख यांनी काही दिवसांपूर्वीच मालेगाव शहरातील विविध अंगणवाड्यांना भेटी देऊन पाहणी केली असता त्यात ही बाब आढळून आली. अंंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहार म्हणून दिले जाणारे पदार्थ अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार अनेक महिलांनी आपल्याकडे केल्याचे शेख यांचे म्हणणे आहे. शहरात अगोदरच साथीच्या रोगांची लागण झालेली असताना, त्यात पुन्हा निकृष्ट दर्जाच्या पोषण आहारामुळे बालकांची प्रकृती खालावत चालली असून, त्यातही ठेकेदाराकडून हा पुरवठा अनियमित केला जात आहे. त्याला ठेका देताना घालून देण्यात आलेल्या अटी-शर्तींचा त्याने भंग केला आहे.
परंतु शासनाकडून संपूर्ण बिले अदा केली जातात व ठेकेदारही निमूटपणे ते घेत असल्याने या साऱ्या प्रकरणाची चौकशी करावी व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सोमवारी शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यांच्या समवेत अन्य महिला नगरसेवकही होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Dangerous nutrition diet in the anganwadi