ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहराला धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:49 IST2020-12-15T20:28:20+5:302020-12-16T00:49:18+5:30
देवगाव : गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबा पीक धोक्यात आले असून, बळीराजाच्या मागचे ग्रहण सुटता सुटेना अशीच काहीशी अवस्था झाली आहे.

ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहराला धोका
अवकाळी पावसाने कंबर मोडलेला बळीराजा हिवाळ्यात काहीतरी साध्य होते का, यासाठी कष्ट करत असताना आता त्याही पिकांवर ढगाळ वातावरण व रिमझिम पावसाने पुन्हा एकदा पाणी फेरले आहे. आंब्याच्या झाडाला आलेला मोहर गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या ढगाळ हवामानामुळे पार कोलमडून गेला आहे. आत्ताच कुठे आंब्याला मोहर फुलायला सुरुवात झाली होती. आंब्याचा मोहर बाहेर पडतो न पडतो तोच ढगाळ हवामानामुळे मोहर गळून पडल्याने शेतकरी धास्तावला आहे.
नाशिक जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून हवामान बदलाने कहर केला असून, काही ठिकाणी ढगाळ तर काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. रिमझिम पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे नुकत्याच झाडाला उमललेल्या मोहराच्या अंकुरांना जोरदार फटका बसल्यामुळे आंब्याचे नुकसान झाले आहे. साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याच्या कालावधीत आंब्याच्या झाडांना मोहर फुलण्यास सुरुवात होते. मोहराला पोषक अशी थंडीचे वातावरण लाभल्यास मोहर भरगच्च येतो. डिसेंबर महिन्यात थंडीचा कडाका जास्त असतो. परिणामी या महिन्यात आंबा चांगला फुलतो; परंतु ऐनवेळी फुलण्याच्या वेळेला हवामानात झालेल्या बदलामुळे मोहराचे नुकसान झाल्याने आंबा उत्पादन संकटात सापडले आहे. या वातावरणामुळे आंब्याला आलेला मोहर पावसामुळे गळायला सुरुवात झाली असून, बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते. यामुळे काही भागात आंब्याचा मोहर गळालेल्या अवस्थेत दिसत आहे, तर काही ठिकाणी काळपट पडला आहे. हापूस, केशरी, राजापुरी आदी प्रकारच्या आंब्यांच्या झाडांचा मोहर ढगाळ वातावरणामुळे गळून पडल्याने आंब्याच्या गोडव्याला घरघर लागली आहे. वातावरणीय बदलांमुळे गळून पडत असलेला आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे.