संततधारेमुळे शेतीसह पिकांची हानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:15 IST2021-09-26T04:15:21+5:302021-09-26T04:15:21+5:30
साकोरा : नांदगाव तालुक्यात सर्वात जास्त पाऊस झाल्याची शासकीय दप्तरी नोंद झाली असून, गेल्या काही दिवसांपासून नांदगावसह साकोरा ...

संततधारेमुळे शेतीसह पिकांची हानी
साकोरा : नांदगाव तालुक्यात सर्वात जास्त पाऊस झाल्याची शासकीय दप्तरी नोंद झाली असून, गेल्या काही दिवसांपासून नांदगावसह साकोरा परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतीला चांगलाच फटका बसला असून, शेतात पाणी तुंबल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तर काही ठिकाणी शेती नापिकी झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.
तीन आठवड्यांपूर्वीच नांदगावसह साकोरा परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीतून बळीराजा अजून सावरलेला नसताना गेल्या चार दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने अनेक ठिकाणी कोबी पिकावर रोग आल्याने शेतकऱ्यांनी कोबीवर रोटोव्हेटर फिरवून पीक नष्ट केले. आता मका, सोयाबीन, कांदे, कांदारोप, कापूस यासह इतर पिकांना मोठा फटका बसला असून, संततधारेने होत्याचे नव्हते करून टाकले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने बळीराजा हताश झाला आहे. पंधरा दिवसांपूर्वी या भागात सलग तीन दिवस चाललेल्या संततधारेने चांगलाच धुमाकूळ घातल्याने साकोरा-नांदगाव रस्त्याशेजारील मोरखडी बंधारा फुटल्याने त्याखाली असलेल्या अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. नदी-नाल्यांनी रौद्र रूप धारण केल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे तालुक्यातील तब्बल २६ हजार हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाल्याचे तालुका कृषी अधिकारी जगदीश पाटिल यांनी सांगितले. नुकसानीचे पंचनामे सुरू असून, आता तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा जोरदार सुरुवात केल्याने जनजीवन पुन्हा विस्कळीत झाले आहे.
--------------------
आर्थिक संकट
दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा अतिवृष्टीचा आर्थिक फटका बसला आहे. अगोदरच विविध कार्यकारी सोसायट्यांकडून यावर्षी भरपाई न मिळाल्याने बळीराजाने उसनवार, कर्ज घेऊन खरीप हंगाम सुरू केला होता. उशिरा आलेल्या पावसाने यावर्षी पिकांना चांगले जीवदान मिळाले होते. त्यामुळे खरीप हंगाम यावर्षी साधणार अशी आशा बळीराजाला लागली होती. मात्र आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांची वाताहत झाली असून, शेतशिवारात साचलेल्या पाण्यातून पीक काढावे तरी कसे अशा विवंचनेत बळीराजा आहे. एकामागून एक येणाऱ्या संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.