शहरात आज दाजिबा वीराची मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2016 00:03 IST2016-03-24T00:03:29+5:302016-03-24T00:03:51+5:30

होळीचे महत्त्व : तिसरी पिढी जपतेय परंपरा; नवसाला पावणारे वीर

Dajiba Virra procession today in the city | शहरात आज दाजिबा वीराची मिरवणूक

शहरात आज दाजिबा वीराची मिरवणूक

 नाशिक : हुताशनी पौर्णिमेनंतर येणाऱ्या धूलिवंदनाला म्हणजेच फाल्गुन वद्य प्रतिपदेला शहरातून दाजिबा वीराची मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.२४) देवीदेवतांचे अवतार धारण करून पारंपरिक पध्दतीने जुने नाशिक परिसरातून दाजिबा वीराच्या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या या वीर मिरवणुकीचे नेतृत्व तिसरी पिढी करते आहे.
हे दाजिबा वीर नवसाला पावणारा असल्याची भावना असून मिरवणूक मार्गावर तसेच घरोघरी जाऊन वीराची भाविक मनोभावे पूजा करतात. धूलिवंदनाची सवाद्य मिरवणूक काढून गोदाकाठी यात्रेचे स्वरूप बघायला मिळणार आहे. जुने नाशिक परिसरातील दाजिबा वीर अर्थात बाशिंगे वीर अशी या वीराची ख्याती असून डोक्याला भरजरी वस्त्रे, कानात सोन्याच्या पगड्या, गळ्यात सरी, हातात सोन्याचे कडे, पायात मारवाडी जोडा, कमरेला धोतर असा वेश धारण करून हे वीर धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी दोन वाजता मिरवणुकीसाठी प्रस्थान करतात. दुपारी निघालेली ही मिरवणूक दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता पूर्ण होते. मिरवणूक मार्गात भाविक वीराची पूजा करतात आणि नवस मागतात. यावेळी भाविकांकडून विविध फुलांचे हार, नारळ, उदबत्ती, बाशिंगाचा जोड अर्पण केला जातो.
फाल्गुन वद्य प्रतिपदेला दाजिबा महाराज वीराची विशिष्ट कथा असल्याने या दिवशी ही मिरवणूक काढतात. नाशिक जवळच असलेल्या दिंडोरी तालुल्यातील जानोरी गावात एक गवळी राहात होता. खंडेराव आद्यदैवत असल्याने गवळी खंडेरायाची निस्सीम भक्ती करत होता. गावात दूध घालून झाल्यावर केवळ ईश्वरसेवेत आपला वेळ घालवणे असा त्याचा नित्यक्रम होता. वयाच्या १६ व्या वर्षी लग्न ठरते आणि अंगाला हळद लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्म हीच सेवा म्हणत हा गवळी दूध घालण्यासाठी कावड आणि कुत्र्यासह निघतो आणि वाटेतच अज्ञाताकडून या गवळ्यावर हल्ला होतो आणि या हल्ल्यात गवळ्याचे निधन होते. हा दिवस फाल्गुन वद्य प्रतिपदेचा असल्याने या दिवसापासून ‘दाजिबा वीराची’ मिरवणूक काढण्याची प्रथा सुरू आहे. त्यावेळी दु:खी झालेले कुटुंबीय घरी परतत असताना गावात वाद्ये वाजण्यास सुरूवात होते. ज्याठिकाणी गवळी खंडेरायाची पूजा करीत असे त्याठिकाणी त्यांची प्रतिमा दिसू लागली आणि ती बोलूदेखील लागली. यावेळी जो कोणी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करतील त्यांची मी इच्छा पूर्ण करेल, अशी आख्यायिका आहे. या आख्यायिकेनुसार हळदीचा नवरदेव बाशिंग लावून दरवर्षी उपवर पत्नीच्या शोधात फिरत असतो. लग्न मंडपात गेल्यावर दाजी म्हणतो म्हणून त्यांना ‘दाजीबा वीर’ तर हळद लावल्यावर बाशिंगे लावून मिरवतात म्हणून ‘बाशिंगे वीर’ असा प्रघात आहे. या बाशिंगे वीराची समाधी दिंडोरी येथील तळोदा येथे असून होळीच्या दिवशी याठिकाणी रात्री पूजा केली जात असल्याची माहिती वीर विनोद बेलगावकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Dajiba Virra procession today in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.